दासगाव : मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे टोळ-आंबेत राज्यमार्ग. डोंगराळ भागातून जाणाºया या मार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. खड्डे पडून चाळण झालेल्या या रस्त्यावरून जाताना प्रवासी आणि वाहन चालकांचे हाल होत आहेत. मुख्य वर्दळीपासून थोडा दूर असल्याने याची अधिक दखल घेतली जात नाही. गणपती सणापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंबेत, मंडणगड, दापोलीकडे जाणाºया गणेशभक्तांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांचा कोकण म्हणून उल्लेख होत असला तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोकणाचे खरे दर्शन होते. ठाणे आणि रायगड हे दोन जिल्हे बºयाच अंशी मुंबईमध्ये समाविष्ट झाले आहेत. यामुळे कोकण म्हणून ठाणे, रायगडच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्या मांडल्या जात असल्या तरी त्या केवळ मुख्य रस्त्यापुरत्या मर्यादित आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणारे अनेक मार्ग आहेत. हे सर्वच मार्ग डोंगराळ भागातून वेडीवाकडी वळणे घेत कोकणात जातात.गणेशोत्सव काळात रस्त्याची दुरुस्ती, पोलीस बंदोबस्त याचा केंद्रबिंदू मुंबई-गोवा महामार्ग असला तरी कोकणात जाणाºया जोडरस्त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. कोकणातील मंडणगड, दापोली, केळशी, खेड, हर्णे यासह असंख्य छोट्या-मोठ्या गावांना टोळ-आंबेत राज्यमार्ग जोडतो. पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात पडणारा जोरदार पाऊस आणि वजनी गाड्यांची वाहतूक यामुळे टोळ -आंबेत या रस्त्याची पार दुरवस्था झालीआहे.मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्याच्या टोळ गावापासून हा मार्ग सुरू होतो. कोकणचे भाग्यविधाते बॅ. ए. आर. अंतुले यांनी काळ नदीवर पूल बांधून हा मार्ग सुरू केला. पूर्वी ही वाहतूक गोरेगाव अगर महाड, रेवतळे मार्गे होत होती. टोळ-आंबेत मार्गामुळे केवळ १२ किमीमध्ये रत्नागिरी जिल्हा जोडला गेला. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिकांसह प्रवासी त्रस्त झाले असून येथून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.
टोळ-आंबेत राज्यमार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:31 AM