नबाबकालीन पोलीस चाळींची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:33 AM2021-03-01T00:33:48+5:302021-03-01T00:33:53+5:30
अनेक वर्षें वसाहतीची सुधारणा नाही : लोखंड गंजले, भिंतीचे प्लॅस्टर सुटले
- संजय करडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड : मुरुडमध्ये पोलिसांच्या निवास खोल्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ४ बाय १२ मीटर वापर क्षेत्रात लादीवगळता अन्य काहीही सुविधा नसल्याने छप्परातून पाणी गळती, समुद्रालगत चाळी असल्याने वेगाने लोखंड गंजत असून, भिंतीचे प्लॅस्टर सुटले आहे. सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या गैरसोयीमुळे पोलीस कर्मचारी त्रस्त असूनसुद्धा याबाबत मौन पाळून आहेत. नबाबकालीन पोलीस चाळीचे रुपडे पालटणे गरजेचे आहे.
आई-वडील मुलाबाळांसोबत निवासस्थानाच्या सुविधांअभावी हेड क्वॉर्टरला राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. साधारणतः ४ बाय १२ मीटर हे वापर क्षेत्र असून, ४७ क्वाॅर्टर्सपैकी केवळ १३ ते १४ कुटुंबाचे सध्या पोलीस निवासस्थानात वास्तव्य असून, अन्य चाळीवजा खोल्या बंद अवस्थेत आहेत.
निखळलेले दरवाजे, पडक्या भिंती, सरपटणारे प्राणी तसेच उंदीर, घुशींचा त्रास नेहमीचाच असून, शौचालयात इलेक्ट्रिक फिटिंग नसल्याने रात्री -बेरात्री सार्वजनिक शौचालयाचा
वापर करणेदेखील अवघड बनले आहे. तसेच समुद्रालगतच्या चाळींना संरक्षक भिंत असणेदेखील महत्त्वाचे आहे.
पोलीस चाळीत सुविधांची वानवा असल्याने पोलीस कर्मचारी आपल्या वृद्ध मातापित्यांना इच्छा असली तरी आणू शकत नाही ही व्यथादेखील व्यक्त करण्यात येते.
मुरुड पोलीस ठाणे वगळले तर काही पोलीस ठाणे कक्षात स्वतंत्र इमारती आढळून येतात. प्रत्येककाला काही ठिकाणी ब्लॉक आहेत; परंतु मुरुड पोलीस ठाण्यात अशी व्यवस्था कधीच करण्यात आलेली
नाही. कार्यरत काही पोलीस स्वतंत्र भाड्याची रूम करूनसुद्धा राहत आहेत. कारण पोलीस वसाहतीमधील बहुतांशी खोल्या कमी
आकाराच्या व जीर्ण असून, वरिष्ठ कार्यालयाने दुर्लक्ष केल्यामुळे या वसाहतींची अजूनच बिकट अवस्था होत आहे.
पोलीस चाळीत पिण्याचे पाणी मात्र एक तास पुरेसे मिळत आहे. एकूण ६ चाळी असल्या तरी सुमद्रालगतच्या १० निवासस्थानांपैकी ४ कुटुंबे तर अन्य १० कुटुंबे कारागृहालगतच्या चाळीत राहत आहेत.
पैसे प्राप्त न झाल्याने काम रखडले
पोलीस ठाण्यातील नबाबकालीन निवासी चाळीतील ४७ खोल्या अंधारमुक्त व आरोग्यवर्धक व्हाव्यात यासाठी माजी आमदार सुभाष पाटील यांनी एप्रिल २०१८ मध्ये विकास आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे देखभाल, दुरुस्तीकरिता असलेल्या पोलीस ठाणे इमारत व पोलीस निवासस्थाने दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिला होता. त्या सूचनेप्रमाणे मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यकारी अभियंता अलिबाग यांच्याकडे मुरुड येथील पोलीस वसाहतीची दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी १४ लाख तर मुरुड पोलीस ठाणे इमारतीची दुरुस्तीसाठी तीन लाख ८३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी सादर करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुरूड कार्यालयाने सांगितले आहे. परंतु हे पैसे प्राप्त न झाल्याने वसाहतीत काम होऊ शकलेले नाहीत.
पडझड होत असल्याने दुरुस्तीची गरज; पाठपुरावा करण्याची मागणी
nनवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करून मुरुडमध्ये नवीन इमारती बनून पोलिसांना चांगली राहण्याची व्यवस्था करावी यासाठी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पाठपुरावा करून काम मार्गी लावावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
nइच्छाशक्तीअभावी हे काम रखडले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनेक वर्ष झाली तरी वसाहती मात्र जुन्याच आहेत. या पोलीस चाळींच्या नूतनीकरणाविषयी मनसे नेते तथा माजी आमदार बाळा नांदगावकर यांनीदेखील युती शासनाच्या काळात विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे आवाज उठवला होता.
nया शंभर वर्षांहून अधिक जुन्या पोलीस चाळींचे बऱ्याच वर्षांपासून दुरुस्ती न केली गेल्याने पडझड व जीर्ण झालेले असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करणे वा नूतन वास्तू उभारण्याची गरज असल्याची आवश्यकता पोलीस मित्रांमध्ये व्यक्त केली जात आहे.
मुरुड येथील पोलीस कर्मचारी वसाहतीबाबतचा आमच्या विभागातील हौसिंग विभागाने माहिती प्राप्त केली आहे. प्रस्ताव पारित होताच पोलीस वसाहतीचे काम सुरू करण्यात येईल.
- अशोक दुधे, जिल्हा पोलीस
अधीक्षक, रायगड