लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : तालुक्यातील नांदगाव समुद्र किनारी महसूल खात्याचा वचक नसल्याने राजरोसपणे समुद्र किनाऱ्यावरील वाळू उपसा करणाऱ्यांची चांदी झाली असून बकळ पैसा वाळू उत्खननाने कमावला जात आहे.वाळू उत्खननाने सातत्याने होत राहिल्याने नांदगाव समुद्र किनारी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे समुद्रकिनारा विद्रूप झाला आहे. वाळूच्या सततच्या उत्खननामुळे नांदगाव समुद्र किनाऱ्यावरील ५०० मीटर पेक्षा जास्त किनाऱ्याची धूप झाली असून जवळच असणाऱ्या नारळी सुपारीच्या बागांना मोठा धोका पोहाेचत आहे. ही वाळू नांदगाव किनाऱ्यावरून पहाटे ३ च्या सुमारास काढली जाते. मुरुड पोलिसांनी पहाटे गस्त वाढवून या वाळू चोरांना पकडून कडक शासन करावे अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांकडून केली जात आहे. सततच्या वाळू उपशामुळे गणपती गौड येथील स्मशानभूमीचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे. वाळू काढल्याने संरक्षक भिंती सुद्धा पडत आहेत. वाळूच्या अवैध उत्खननामुळे नागरिक त्रस्त असून महसूल खात्याने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. समुद्र किनाऱ्यावरील वाळू ही बांधकामासाठी वापरली जात असल्याने असंख्य लोक या वाळूचा उपयोग करीत असतात. त्यातच वाळू अगदी जवळ मिळत असल्याने वाळू उत्खनन राजरोसपणे करीत आहेत. समुद्र किनाऱ्यावरील वाळू काढल्याने काही ठिकाणचा भराव सुद्धा ढासळला आहे. ही वाळू बैलगाड्यांतून अथवा टेम्पोने वाहतूक केली जात आहे.सातत्याने समुद्रावरील वाळू काढल्याने काही ठिकाणच्या नारळ -सुपारीच्या बागायत जमिनीला सुद्धा धोका पोहचला आहे. महसूल खात्याने लक्ष देऊन वाळू उत्खनन रोखावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत माजी सरपंच विद्याधर चोरघे यांनी नांदगाव समुद्र किनारी सातत्याने वाळू उपसा झाल्याने जागो जागी खड्डे पडले आहेत. गोविंद प्रधान यांच्या मालकीच्या बागायत जमिनीतील सुमारे शंभरच्यावर नारळाची झाडे पडली आहेत. तर गणेश चोरघे यांच्या बागायत जमिनीतील ३० पेक्षा जास्त नारळाची झाडे पडली आहेत. सततच्या वाळू उपशामुळे नांदगाव समुद्र किनारा खड्डेमय झाला आहे. महसूल खात्याने तातडीने लक्ष्य देऊन वाळू नेणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. असेच वाळू उत्खनन सुरु राहिले तर बागायत जमिनी नामशेष होणार आहेत. महसूल खात्याने सजग होऊन अशा लोकांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
वाळू चोरणाऱ्यांवर महसूल खात्याचे लक्ष असून आम्ही तपासणी पथक सुद्धा तैनात केले आहेत. आतापर्यंत काही लोकांना पकडून त्यांच्याकडून दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे. नांदगाव बाबतची समस्या निराकरण करण्यासाठी गस्त वाढवून लवकरच वाळू चोरणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल.- गमन गावित, तहसीलदार, मुरुड