- अजय कदममाथेरान : कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे रेल्वेने बांधलेल्या १०५ वर्षे जुन्या असलेल्या रेल्वेच्या धरणाला तडे गेले आहेत. यामुळे हे धरण फुटून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने येथील नागरिक चिंतेत आहेत.१९१२मध्ये या धरणाची निर्मिती रेल्वे प्रशासनामार्फत कर्जत तालुक्यातील पळसदरी या गावी केली गेली होती. त्या काळी वाफेच्या इंजिनाला पाणी पुरविण्यासाठी या धरणाचा उपयोग होत होता. १९९० मध्ये वाफेचे इंजिन बंद केल्याने रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या धरणाचे पाणी कर्जत शहराला पुरविण्यास सुरुवात केली; परंतु काही वर्षांतच कर्जत नगरपरिषदेने आपला स्वतंत्र पाणीपुरवठा केल्यामुळे या धरणाकडे रेल्वे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे धरणाच्या भिंतीला झाडेझुडपे वाढल्याने धरणाला तडे जाऊन ते फुटण्याची भीती येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.मुंबई-पुण्यापासून पळसदरी हे गाव जवळ असल्याने, तसेच येथे स्वामी समर्थांचा मठ असल्याने येथे पर्यटकांची सतत मांदियाळी असते. पावसाळ्यात येथील हिरवीगार वनराई व धबधब्यांमुळे हे धरण परिसर नेहमी पर्यटकांमुळे बहरलेले असतात. धरण बांधल्यापासून यातील गाळ न काढल्यामुळे पोहण्यासाठी उतरलेले पर्यटक गाळात अडकल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी धरणाच्या बाजूला देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाने गार्ड नियुक्त केले होते. त्यामुळे येथे कोणीही पोहण्यासाठी येत नव्हते. त्या गार्डना राहण्यासाठी धरणाच्या बाजूला खोल्या व गार्डन होते; परंतु सध्या येथे आता कोणीही राहत नसून गार्ड रूम व गार्डनची पूर्ण वाताहत होऊन तळीराम व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे.पळसदरी येथील ग्रामस्थ अॅड. राजेंद्र निगुडकर, अमित घाटगे, अॅड. सचिन दरेकर, नारायण दरेकर, शैलेश निगुडकर यांनी चिंता व्यक्त करून, या धरणाची डागडुजी रेल्वे प्रशासनाने त्वरित करावी, अशी मागणी केली आहे.ब्रिटिशकालीन हे पळसदरी धरण १९१२मध्ये रेल्वे प्रशासनाने बांधले. १०५ वर्षे उलटूनही अजूनही हे धरण साफ केले गेले नाही. यातील गाळ न काढल्यामुळे पर्यटकांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. तसेच बांधावर झाडेझुडपे वाढल्यामुळे बांधाला तडा गेला आहे. भविष्यात जर बांध फुटला, तर कर्जत-खोपोली, कर्जत-पुणे रेल्वेमार्ग तसेच आवळस, आकुरले, शिरसे, मुद्रे आणि कर्जत या गावांना धोका पोहोचू शकतो. याची सर्वस्वी जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची राहील.- अॅड. राजेंद्र निगुडकर, स्थानिक
पळसदरी धरणाला तडे, नागरिक भयभीत, धरण फुटल्यास जीवितहानी होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 7:01 AM