पनवेल : १ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आजतागायत लसीकरणात विविध अडथळे येत आहेत. सर्वप्रथम ऑनलाइन प्रक्रियेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लसीकरणात अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर वारंवार लसींचा साठा संपुष्टात येत असल्याने खासगी रुग्णालयातून लसीकरणाविना घरी परतावे लागत आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ही समस्या निर्माण होत आहे. विशेष म्हणजे पनवेलमधील पारा ३८ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला असताना अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना लसीसाठी रुग्णालयात फेरे मारावे लागत आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सहा प्राथमिक नागरिक केंद्रात व ११ खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यात येत आहे. दि. २० मार्चपर्यंत पालिका क्षेत्रात ३४,५०० जणांना कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले, तर दुसरा डोस दिला जाणारे कोव्हॅक्सिन ६,००० जणांना देण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात दिल्या जाणाऱ्या कोव्हॅक्सिनचा तुटवडा भासत असल्याने दुसरा डोस मिळण्यास अनेकांना अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग आहे. दररोज सुमारे २,००० जणांना लसीकरण केले जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल अधिकाऱ्यांनंतर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र शासनामार्फत योग्य समन्वय होत नसल्याने निश्चित वेळेत या लसी खासगी रुग्णालय अथवा नागरी केंद्रात पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे.