भूखंड पोलीस क्रीडांगणासाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:02 AM2018-01-15T01:02:51+5:302018-01-15T01:02:55+5:30
रोडपाली येथील भूखंड पोलिसांना देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र, रोडपालीवासीयांनी याला विरोध दर्शवला आहे.
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : रोडपाली येथील भूखंड पोलिसांना देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र, रोडपालीवासीयांनी याला विरोध दर्शवला आहे. एकता सामाजिक सेवा संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आमच्या मुलांनी कुठे खेळायचे कुठे, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे हा मुद्दा कळीचा ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या समोर त्याचबरोबर नीलकंठ टॉवरच्या बाजूला सेक्टर १७ येथे क्रीडांगणाकरिता राखीव जागा आहे. येथे क्रीडा संकुल उभारण्याकरिता एका संस्थेला भूखंड देण्यात आला होता, परंतु सभासदांकडून लाखो रुपये जमा करून संस्थाचालक पसार झाले. त्यामुळे क्रीडा संकुलाचा प्रस्ताव रेंगाळला. आता पावणेआठ एकराचा भूखंड मोकळा आहे. रोडपालीला क्रीडांगणाची वानवा असताना सिडकोने अद्यापही ही जागा विकसित केली नव्हती. मात्र, पोलीस क्रीडा स्पर्धेकरिता पोलिसांनी या भूखंडाचा कायापालट केला. मंगळवारी राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा पोलिसांना देण्याबाबत सिडकोला निर्देश देणार असल्याचे जाहीर केले. यावर रोडपाली येथील एकता सामाजिक सेवा संस्थेने आक्षेप नोंदवला आहे.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. या भूखंडाचा पोलिसांनी कायापालट केला. त्याचबरोबर त्यांना क्रीडांगण पाहिजे याबाबत रहिवाशांच्या मनात कोणतेही दुमत नसल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. परंतु या ठिकाणी स्थानिक रहिवाशांकरिता क्रीडांगण सिडकोच्यामार्फत विकसित व्हावे अशी आमची न्याय मागणी असल्याचे पत्रात म्हटले आहे. पोलिसांना हे क्रीडांगण दिले तर तिथे सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाणार नाही. रोडपालीतील नागरिकांचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे.