जिल्ह्यात नांगरणी, भात लावण्यांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:17 AM2018-06-24T01:17:31+5:302018-06-24T01:17:34+5:30
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगले सातत्य राखल्याने, भातशेतांमध्ये भात लावण्यांकरिता आवश्यक पाणी अपेक्षेप्रमाणे साचले आहे.
जयंत धुळप
अलिबाग : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगले सातत्य राखल्याने, भातशेतांमध्ये भात लावण्यांकरिता आवश्यक पाणी अपेक्षेप्रमाणे साचले आहे. परिणामी शेतकऱ्यांनी भात शेतीत लावण्यांकरिता आवश्यक नांगरणी आणि प्रत्यक्ष लावण्यांना देखील प्रारंभ केला आहे.
पेरण्या वेळेवर झाल्या होत्या अशा शेतकºयांच्या शेतातील भातरोपांची उगवण चांगल्या प्रकारे होवून ती रोप लावणी योग्य झाल्याने, लावण्यांकरिता मजूर तातडीने घ्यावे लागले, परिणामी मजुरी दर अधिक द्यावा लागला. पुरुषाला ४०० रुपये तर स्त्रीला ३०० रुपये मजुरी आणि दुपारचे जेवण दिल्याची माहिती म्हात्रोळी-सारळ येथील शेतकरी राजू म्हात्रे यांनी दिली.
रेवस पट्ट्यात येणाºया मजुरांमध्ये रामराज-भोनंगमधील आदिवासी बांधवांचे प्रमाण अधिक असल्याचे म्हात्रे यांनी पुढे सांगितले. सध्या भात लावण्यांचा प्रारंभीचा काळ असल्याने लावणीकरिता मजूर परवडणाºया मजुरी दरात उपलब्ध होत आहेत. मात्र सर्वत्र भात लावण्या एकाच वेळी सुरू झाल्यास, मजुरांचा तुटवडा निर्माण होतो.
साहजिकच मजुरीचे दर वाढतात, अशी परिस्थिती बामणगाव येथील नैसर्गिक शेती करणारे शेतकरी महेश्वर देशमुख यांनी सांगितले. अलीकडे नांगरधारी मजुरांचे प्रमाण पॉवरटिलरमुळे काहीसे कमी झाले आहे.
पारंपरिक नांगरणीला लागणाºया वेळेच्या निम्यापेक्षा कमी वेळात पॉवरटिलरच्या माध्यमातून नांगरणी होत असल्याने, शेतकरी पॉवरटिलरचा वापर करू लागले आहेत. मजुरीचे दर ३०० रुपये आहेत तर पॉवरटिलरचा दर ताशी ८०० ते ९०० रुपये असल्याचे देशमुख यांनी पुढे सांगितले.
हाशिवरे व अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून त्या नापिकी झाल्याने खारेपाटातील शेतकरी आता अलिबाग तालुक्यातील अन्य भागात भात लावणीकरिता येवू लागल्याचे गेल्या तीन-चार वर्षांपासून दिसून येत असल्याचा निष्कर्ष देशमुख यांनी सांगितला आहे.
महाड-पोलादपूर परिसरात पेरण्यांतून भात रोपांची उगवण चांगल्या प्रकारे झाली आहे. काही ठिकाणी भात लावण्यांना देखील प्रारंभ झाला आहे. सोमवारपासून सर्वत्र वेगाने लावण्या सुरू होतील, असा विश्वास बिरवाडीमधील प्रयोगशील शेतकरी डॉ. दिलीप सोनावणे यांनी दिली आहे. लावणीकरिता प्रारंभीच्या काळात मजुरीचे दर कमी आहेत, मात्र सर्वत्र लावण्या सुरू झाल्या की हे दर वाढतील. सध्या जेवणासह मजुरीचा दर २५० ते ३०० रुपये आहे आणि नांगरणीच्या पॉवरटिलरचा दर तासाला ४०० रुपये असल्याचे डॉ.सोनावणे यांनी पुढे सांगितले.
माथेरान येथे सर्वाधिक २६४ मि.मी. पावसाची नोंद
शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात माथेरान येथे सर्वाधिक २६४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी कर्जत- २३८.६०,रोहा-१०७, तळा-९५, खालापूर-९१.५०, पेण-५२.२०, सुधागड-५०, अलिबाग-४९, पनवेल-४३.४०, म्हसळा-३४.८०,मुरु ड-३२, माणगाव-३०,महाड-२५, उरण-२४, पोलादपूर-२० तर श्रीवर्धन येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या प्रमुख नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली असली तरी ती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.