ताडवाडी-मोरेवाडीसाठी नळपाणी योजना अद्याप कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:59 AM2019-11-09T00:59:47+5:302019-11-09T00:59:55+5:30

रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हवेत विरले : उद्भव कुठे असावा, यासाठी रखडले काम

Plumbing schemes for Tadwadi-Morewadi still on paper | ताडवाडी-मोरेवाडीसाठी नळपाणी योजना अद्याप कागदावर

ताडवाडी-मोरेवाडीसाठी नळपाणी योजना अद्याप कागदावर

Next

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी आणि मोरेवाडीमध्ये नेहमीप्रमाणे पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्या दोन्ही वाड्यांसाठी पावसाळ्यापूर्वी नळपाणी योजना कार्यान्वित करावी, असे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये दिले होते. त्यानंतर या ठिकाणी गतवर्षी जिल्हा परिषदेने नळपाणी योजना मंजूर केली होती. मात्र, ही नळपाणी योजना आजही कागदावरच आहे. डिसेंबर २०१७ मध्ये या नळपाणी योजनेची घोषणा रायगड जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाने केली होती. दरम्यान, नळपाणी योजनेचा उद्भव कुठे असावा, यासाठी या दोन्ही टंचाईग्रस्त गावांची नळपाणी योजना रखडली असून येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन जावे लागत आहे.

पाथरज ग्रामपंचायतमधील सात पाड्यांची बनलेली ताडवाडी ही कर्जत तालुक्यातील मोठी आदिवासीवाडी समजली जाते. तर त्या शेजारी असलेली मोरेवाडी हीदेखील ताडवाडीच्या विहिरीवर अवलंबून असलेली आदिवासीवाडी आहे. त्या दोन्ही आदिवासीवाड्यांमधील महिलांना जानेवारी महिन्यापासूनरात्र विहिरीवर काढावी लागते. गतवर्षी त्याबाबत माध्यमांनी दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेला सूचित केल्यानंतर जिल्हा परिषद लघु-पाटबंधारे विभागाने २७ लाख रुपयांची तरतूद दुरुस्तीसाठी केली होती. मात्र, स्थानिक आदिवासी लोकांनी आम्हाला दुरुस्ती नको तर नवीन पाणी योजना पाहिजे आणि त्या योजनेचा उद्भव हा बांगरवाडी मातीच्या बंधाºयाचा असावा, अशी मागणी केली होती.

त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाने त्या ठिकाणी नळपाणी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या २७ लाखांचा निधी थांबवून ठेवला. जानेवारी २०१८ मध्ये अंदाजपत्रक तयार करताना नवीन नळपाणी योजना ही बनगरवाडी येथे असलेल्या मातीच्या बंधाºयातील उद्भव निश्चित करण्यात आला. त्यासाठी नव्याने तयार झालेले अंदाजपत्रक हे एप्रिल २०१८ मंजूर झाले नाही. त्या वेळी नव्याने केलेले अंदाजपत्रक हे ६७ लाखांचे बनले होते. मात्र, बांगरवाडी येथील मातीचा बंधारा हा जुना असून तेथील पाण्याचा काही भरवसा नसल्याने आमसभेत त्यावर पुन्हा चर्चा झाली. मोरेवाडी तसेच ताडवाडीसाठी नळपाणी योजना करताना ती डोंगरपाडा येथील पाझर तलावाच्या पाण्यावर करण्याची सूचना आमदार सुरेश लाड यांनी केली. त्यामुळे आता ९३ लाख रुपयांचे नवीन अंदाजपत्रक तयार झाले असून ताडवाडी आणि मोरेवाडीसाठी डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचे निश्चित झाले आहे.

पाण्यासाठी भटकं ती
ताडवाडी आणि मोरेवाडी या दोन्ही वाडीतील लोकांसाठी तेथे असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्या वेळी शेजारी असलेल्या मोरेवाडी येथील महिलांची बांगरवाडी मातीच्या धरणावर पाण्यासाठी जाण्याची भटकंती सुरू झाली आहे. त्यामुळे गतवर्षी मंजूर झालेली नळपाणी योजना आता प्रत्यक्षात आली असती तर दोन्ही आदिवासीवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी विहिरीवर रात्र काढण्याची वेळ आली नसती. त्यात पाथरज ग्रामपंचायत गेल्या तीन महिन्यांपासून त्या ठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये टँकरचे पाणी टाकत असल्याने सध्या तरी ताडवाडी आणि मोरेवाडीला पाणी मिळत आहे.

बांगरवाडी येथील मातीचा बंधारा शासनाचा नाही, त्यात त्या बंधाºयांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे पहिल्यापासून मागणी असलेल्या डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक आल्याने योजनेला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती, आता त्यांना गती मिळाली असून, योजना महिनाभरात सुरू होईल.
- रेखा दिसले, सदस्य, रायगड जिल्हा परिषद

ताडवाडी आणि मोरेवाडी येथील नळपाणी योजनेची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर आहे. मात्र, स्थानिक लोकांनी उद्भव बदलण्याची सूचना केल्याने सर्व अंदाजपत्रक नव्याने करायची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अद्याप कामाला सुरुवात झाली नाही.
- डी. आर. कांबळे,
उपअभियंता, लघु-पाटबंधारे विभाग

Web Title: Plumbing schemes for Tadwadi-Morewadi still on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड