'दत्तक घेतलेलं गाव मोदींना नीट करता आलं नाही, ते देशाचं काय भलं करणार?'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 09:01 PM2019-04-19T21:01:39+5:302019-04-19T21:10:30+5:30
स्वतः जे गाव दत्तक घेतलं ते जर तुम्ही नीट करू नाही शकलात तो माणूस ह्या देशाचं काय भलं करणार ? असा प्रश्न करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ लोकांसमोर दाखविला.
महाड - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतलं त्यात काहीच घडलं नाही. गावात एकही सुविधा आली नाही. साधे नाले साफ नाही होऊ शकले ना महाविद्यालय ना दवाखाना आहे. स्वतः जे गाव दत्तक घेतलं ते जर तुम्ही नीट करू नाही शकलात तो माणूस ह्या देशाचं काय भलं करणार ? असा प्रश्न करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ लोकांसमोर दाखविला.
रायगड लोकसभा मतदारसंघातील महाडमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या योजनांवर टीका केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी धसई गावाचा व्हिडीओ दाखवत देशातले धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे असं मोदींनी जाहीर केलं पण ह्या गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे आणि ह्या गावात अनेकांचं बँक खातं नाही त्यामुळे त्यांचे सगळेच व्यवहार रोखीत होतात असा आरोप केला.
नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखं काहीच उरलं नाही त्यामुळे आता पुलवामात शहीद जवानांच्या नावावर मतं मागत आहे. आजपर्यंत कधीच झालं नाही, की पाकिस्तनाचा पंतप्रधान, भारताचा पंतप्रधान कोण असावा ह्यावर बोलत आहेत.काय कारण आहे की इम्रान खान ह्यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावेत असं वाटतं? अशी शंका राज ठाकरे यांनी उपस्थित केली.
अटलजींच्या काळात कारगिल झालं तरी..
अटलजींच्या वेळेस पण कारगिल झालं होतं पण त्यांनी त्याचा कधी बाजार नाही मांडला जसा मोदी मांडत आहेत. जे जे १९३० ला हिटलरने जर्मनीत करायचा प्रयत्न केला तोच सगळा प्रकार नरेंद्र मोदी २०१४ पासून करायचा प्रयत्न करत आहेत. पण ते विसरले की सोशल मीडिया आता आहे जो तुम्हाला आरसा दाखवतो असा टोला राज यांनी लगावला.
मेक इन इंडियावर टीकास्त्र
वैमानिक अमोल यादवला मेक इन इंडियात पहिलं विमान बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. महाराष्ट्र शासनाने त्याला पालघर येथे जमीन दिली. हा व्यवसाय सुरु करावा म्हणून महाराष्ट्र सरकारने वारेमाप आश्वासन दिली, शेवटी त्याला सरकारी यंत्रणेने इतकं जेरीस आणलं की हा मुलगा आता अमेरिकेत एका कंपनीबरोबर हा व्यवसाय सुरु करतोय अशी टीका राज यांनी केली.
शिवसेना-भाजपा सत्तेसाठी लाचार
शिवसेना-भाजपने एकमेकांना यथेच्छ शिव्या दिल्या आणि पुन्हा युती केली कारण दोन्ही पक्ष लाचार आहेत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील असा टोला शिवसेना-भाजपाला राज ठाकरेंनी यांनी लगावला तसेच ही निवडणूक देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी आहे. म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठी मतदान करा. मोदींना संजीवनी देतील अशा पक्षांनाही मतदान करु नका असं सांगत राज यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला मतदान करु नका असंही आवाहन लोकांना केलं.