पनवेल : पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेच्या आणखी एका खातेदाराचा खारघरमध्ये मृत्यू झाला आहे. खारघर सेक्टर १० मध्ये राहणाऱ्या कुलदीप कौर विग (६४) असे खातेधारकाचे नाव आहे. बँकेत पैसे अडकल्याने अनेक ग्राहक हवालदिल झाले आहेत.
मंगळवारी पीएमसी खातेधारकांनी मुंबईत निदर्शने केली. यासंदर्भात बातम्या वृत्तवाहिन्यांवर दाखविल्या जात असताना कुलदीप कौर चिंतीत झाल्या. आरबीआय यासंदर्भात अद्याप तोडगा काढत नसल्याने आपले पैसे परत मिळतील का? अशी चिंता त्यांनी पती वरिंदर सिंग विग यांच्याजवळ व्यक्त केली. मंगळवारी सकाळी ११.३० च्या प्रसंगानंतर कुलदीप कौरला अस्वस्थ वाटू लागले. दुपारी २ च्या सुमारास कुलदीप यांना हृदयविकाराचा झटका आल्याने कुटुंबीयांनी नजीकच्या खासगी दवाखान्यात नेले. या वेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुलदीप कौर यांना तीन मुले आहेत. यापैकी एक मुलगी अमेरिकेला असते, तर दुसरी मुलगी पतीचे निधन झाल्याने विग कुटुंबीयांसोबत राहते. आपल्या मुलीच्या भविष्यासाठी विग कुटुंबीयांनी १५ लाखांची एफडी उघडली होती. तर उर्वरित बचत खात्यामध्येही जवळ जवळ तीन लाखांपेक्षा जास्त पैसे अडकले आहेत. कुलदीप यांचे पती वरिंदर सिंग विग हे जीटीबीनगरला गुरु तेग बहादूर हायस्कूलमध्ये नोकरी करतात, तर मुलगा सुखबीर रिअल इस्टेटमध्ये कार्यरत आहे. बॅँकेत लाखो रुपये अडकल्याने विग कुटुंबीयांनी यंदा दिवाळीही साजरी केली नाही.मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडली घटनाकुलदीप कौर यांना हृदयविकाराशी संबंधित कोणताही आजार नव्हता. मात्र, बँकेत पैसे अडकल्याने त्या सतत तणावात होत्या. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही घटना घडल्याने मुलगा सुखबीर मानसिक धक्क्यात आहेत. दुसरी मुलगी अमेरिकेतून परतण्यास दोन दिवसाचा कालावधी लागल्याने दोन दिवसांनंतर शुक्रवारी कुलदीप कौर यांच्यावर अंत्यसंस्कार केले.