पीएमसी बँक घोटाळा : राकेश, सारंग वाधवा यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 01:07 AM2019-10-09T01:07:06+5:302019-10-09T01:07:15+5:30

शनिवारी ईडीने वाधवा यांच्या अलिबाग तालुक्यातील आवास येथील २०० खोल्यांच्या फार्महाउसवर कारवाई केली.

PMC Bank scam: Rakesh, Sarang Wadhwa seize property in Alibaug | पीएमसी बँक घोटाळा : राकेश, सारंग वाधवा यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त

पीएमसी बँक घोटाळा : राकेश, सारंग वाधवा यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त

googlenewsNext

अलिबाग : पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) आर्थिक गैरव्यवहार प्रकणात अडकलेल्या राकेश आणि सारंग वाधवा यांच्या अलिबाग तालुक्यातील आवास येथील फार्महाउसवर ईडीने शनिवारी छापा टाकला. छाप्यामध्ये अनेक कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यानंतर आता ईडीने सोमवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील फाल्कन-२०० जेट विमान ताब्यात घेतले आहे. ईडीने केलेल्या कारवाईतील हे दुसरे जेट विमान असल्याचे बोलले जाते.
शनिवारी ईडीने वाधवा यांच्या अलिबाग तालुक्यातील आवास येथील २०० खोल्यांच्या फार्महाउसवर कारवाई केली. बंगल्याच्या आवारात गाड्या, नौका आढळून आल्या आहेत. त्यामध्ये दोन बॅटरीवर चालणारी गोल्फ कार्ट्स, तीन माउंटन बाइक्स, एक स्पीडबोट आणि एक मर्सिडिज बेंझ, बेंटली, रोल्स रॉइस या गाड्यांचा समावेश आहे.
यापैकी एक कार कर्नाटकमधील आहे. दोन कार या पेण, रायगड आणि ठाणे येथील आरटीओ कार्यालयात पासिंग केल्याचे समोर आले आहे. बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या राकेशकुमार वाधवा आणि त्याचा मुलगा सारंग यांच्या नावावर आहेत, तर कर्नाटक पासिंगची कार ही हाउसिंग डेव्हलपरच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत वाधवाच्या सुमारे १५ गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत, तसेच मालदीवमध्ये एक यार्ट (नौका) आणि एअरक्र ाफ्टही आढळून आले होते.
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआईएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवा यांना ३ आॅक्टोबर रोजीच अटक करण्यात आली आहे.
पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष विरमसिंह यांच्या खात्यात ईडीला दहा कोटी रुपये सापडले आहेत, त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत शेकडो कोटीच्या संपत्तीचा उलगडा झाला आहे. ईडी लंडन आणि दुबईमधील मालमत्तांचाही शोध घेत आहे. तेथील मालमत्तांचा वाधवा यांच्याशी काही संबंध आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे.
विशेष बाब, म्हणजे जिल्हा प्रशासनाने सीआरझेडचे उल्लंघन केल्या प्रकरणी १५९ जणांना नोटीस बजावली होती. त्यामध्येही वाधवा यांच्या या बंगल्याचा समावेश आहे. सध्या सीआरझेड कारवाईवर वाधवा यांनी न्यायालयातून स्थगिती घेतली आहे.

- पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी डायमंड किंग नीरव मोदी यानेही सीआरझेडचे उल्लंघन केले होते. त्यानंतर त्याच्या किहीम येथील बंगल्यातील किमती वस्तूंचा लिलाव करण्यात येऊन त्याच्या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. वाधवा याच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडली आहे आणि अजून त्यामध्ये भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या माध्यमातून पीएमसी बँकेतील ठेवीदारांची रक्कम देणार का याबाबात अद्याप स्पष्ट झालेले नाही. ईडी ज्याच्या मागावर आहे तो फरार असलेल्या मेहुल चोकसी याचा बंगला वाधवा याच्या बंगल्यापासून काही अंतरावरच आहे.

Web Title: PMC Bank scam: Rakesh, Sarang Wadhwa seize property in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.