माथेरानमधील पॉइंट्स पर्यटकांसाठी धोकादायक, सेल्फीच्या नादात जीवघेणी कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:37 AM2019-09-30T02:37:33+5:302019-09-30T02:37:58+5:30
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची वर्षभर गर्दी असते.
माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. मात्र, विविध पॉइंटवर सेल्फी काढण्याच्या नादात तरुणवर्ग आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे. दस्तुरीपासून पुढे आल्यावर रेल्वेच्या बाजूला दिसणाऱ्या डोंगरदऱ्यांचे अलौकिक नयनरम्य देखावे कॅमेºयात टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. मात्र, या वेळी स्वत:च्या सुरक्षेकडे त्यांचे दुर्लक्ष होताना दिसते.
माथेरानमधील अनेक पॉइंटवर संरक्षण भिंत अथवा लोखंडी रेलिंग नाहीत. पर्यटनासाठी येणारे महाविद्यालयीन तरुण-तरुणी कड्याच्या जवळ जाऊन फोटोग्राफी आणि सेल्फी काढताना दिसतात. थोडा जरी तोल गेला अथवा एखादा दगड घरंगळला तरी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टीमुळे माती भुसभुशीत झाली आहे, त्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दस्तुरीवरून रेल्वेच्या रुळालगत असंख्य पर्यटक पायी जात असतात. या ठिकाणी मोठा कातळ असून त्यावर चढून फोटो काढणे आणि दोन ते तीन हजार फूट उंचीवर असणाºया जागेत सेल्फी काढण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसतात. त्यामुळे या ठिकाणी संबंधित खात्याने काटेरी तारांचे कुंपण, रेलिंग लावून संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी होत आहे.