मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानमधील २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पॉइंट्सची दुर्दशा झाली होती तर बहुतांश मुख्य पॉइंट्स इतिहासजमा होण्याच्या मार्गावर होते. यासाठी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता अरविंद धाबे यांना याबाबत माहिती दिल्यावर दोन वर्षांपासून येथील पॅनोरमा, हार्ट आणि मायरा या महत्त्वाच्या पॉइंट्सच्या डागडुजी तसेच सुशोभीकरणाची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे लवकरच येथील प्रमुख पॉइंट्सला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे.
मायरा आणि हार्ट पॉइंट्सच्या कामांची पाहणी करण्यासाठी शनिवारी नगर परिषद आणि एमएमआरडीएच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या वेळी एमएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांच्यासह नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगर परिषद गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक नरेश काळे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम आखाडे, सागर पाटील, विजय कदम, आदित्य भिल्लारे यांसह ही कामे पूर्ण करण्यासाठी नेमलेले एन.ए. कन्स्ट्रक्शनचे जुझरभाई आदी उपस्थित होते.
मायरा, हार्ट आणि पॅनोरमा हे मुख्य पॉइंट्स नामशेष होण्याच्या मार्गावर असताना एमएमआरडीएचे अभियंता धाबे यांनी पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी विकासात्मक कामावर भर दिला. हार्ट आणि मायरा पॉइंट येथे जाण्यासाठी साधी पायवाटसुद्धा उपलब्ध नव्हती. सर्व रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. पॉइंट्सवरील धोकादायक ठिकाणी काळ्या दगडात ग्याबियन वॉल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून संरक्षण रेलिंगची कामे सुरू करण्यात येत आहेत.
पर्यटकांना विश्रांतीसाठी बाकडे बसविण्यात येणार आहेत. अतिउताराच्या जागी जांभ्या दगडाच्या पायऱ्यांची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. मायरा पॉइंटवर एका बाजूला ग्याबियन वॉल बांधण्यात आली आहे, तर दुसºया बाजूला इंदिरा गांधी नगर येथील लोकवस्तीला भविष्यात अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे घरांच्या संरक्षणासोबत पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी ग्याबियन वॉल बांधण्यात यावी, असे निर्देश नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी धाबे यांना पत्राद्वारे दिले आहेत.
पॉइंटवरील जुन्या झाडांचे संगोपन व्हावे यासाठी जांभ्या दगडात संरक्षक कठडे उभारण्यात यावेत. पॅनोरमा पॉइंट, दस्तुरी पार्किंग आणि मायरा पॉइंटच्या कामांचे उद्घाटन २१ मे या माथेरानच्या वर्धापनदिनी करण्याचे निश्चित केल्याचे गटनेते प्रसाद सावंत यांनी सांगितले.एकंदरीतच सध्या सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी कामांमुळे आगामी काळात पर्यटन व्यवसाय नक्कीच वृद्धिंगत होऊन स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी आशा या वेळी व्यक्त करण्यात आली.