आक्षी गावांतील पाटील कुटूंबाचे विष प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 06:21 PM2018-07-05T18:21:32+5:302018-07-05T18:21:34+5:30
शरिरात विष निष्पन्न झाले,गॅस्ट्रीक अॅस्पिरेशन सॅम्पल तपासणीअंती होणार स्पष्टता
जयंत धुळप
अलिबाग जवळच्या आक्षी गावांतील पाटील कुटूंबातील पाच सदस्यांना त्यांच्याच घरातून बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध आणि अत्यावस्थ अवस्थेत शेजारच्यांनी अलिबाग येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल केले होते. त्यांतील रामचंद्र दत्तात्नेय पाटील (60) आणि पत्नी रंजना रामचंद्र पाटील(50)जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहेत. रामचंद्र दत्तात्नेय पाटील यांची प्रकृती चांगल्या पैकी सुधारली आहे, मात्र त्यांंच्या पत्नी रंजना रामचंद्र पाटील यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दरम्यान सून कविता राहूल पाटील(25), नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष)या तिघांना बुधवारी मुंबईतील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, त्यांचीही प्रकृती सुधारत असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगीतले.
शरिरात विषांचा अंश प्राथमिक तपासणीत निष्पन्न
वैद्यकीय उपचाराच्यावेळी या सर्वाच्या शरिरात विषांचा अंश असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यांच्या पोटातील विष काढण्याकरिता जी गॅस्ट्रीक अस्पिरेशन वैद्यकीय प्रक्रीया अवलंबली जाते त्यावेळी रुग्णांच्या पोटातून प्राप्त अन्न व अन्य द्रव यांचे नमुने घेवून ते पोलीस तपास यंत्रणोकडे पूढील शास्त्रीय तपासण्याकरीता देण्यात आले आहेत. त्या शास्त्रीय तपासण्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर या बाबत अधिक स्पष्टता होवू शकेल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी दिली आहे.
आम्ही कोणत्याही प्रकारचे विष प्राषन केलेले नाही
रामचंद्र दत्तात्नेय पाटील यांची प्रकृती सुधारल्याने तसेच व्यवस्थित बोलू लागले असल्याने त्यांचा या घटनेच्या अनूशंगाने पोलीसांनी गुरुवारी सकाळी जबाब घेतला असता, पाटील यांनी आपल्या कुटूंबाने कोणत्याही प्रकारचे विष प्राषन केलेले नाही. मंगळवारी रात्री केवळ आम्ही सर्वानी कोल्ड्रींक घेतले होते,असे सांगितल्याचे या घटनेचे तपासीक अंमलदार व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी सांगीतले. मंगळवारी संध्याकाळ पासून आक्षी गावांत विज नसल्याने रात्री घरात दिवे लागण्याकरिता व फॅन चालण्याकरिता रॉकेलवर चालणार जनरेटर लावला होता. जनरेटरच्या गॅस मुळे त्रस झाल्याचे रामचंद्र दत्तात्नेय पाटील यांनी पूढे सांगीतल्याचे पोलीस निरिक्षक पाटील यांनी सांगीतले.
फिनेल सारख्या द्रवाची एक रिकामी व एक भरलेली बाटली पोलीसांच्या ताब्यात
दरम्यान पाटील यांच्या आक्षी येथील घरात पोलीस तपास पथकाने केलेल्या तपासणीत जनरेटर आणि त्याकरीता आठ लिटर रॉकेल वापरले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच बरोबर बुधवारी घरातून फिनेल सारख्या द्रवाच्या एक रिकामी व एक भरलेली बाटली पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.