पोलादपूरची ४६ गावे, १२३ वाड्यांमध्ये टंचाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:25 AM2020-03-04T00:25:26+5:302020-03-04T00:25:29+5:30

कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे.

Poladpur in 5 villages, 5 wards in shortage? | पोलादपूरची ४६ गावे, १२३ वाड्यांमध्ये टंचाई?

पोलादपूरची ४६ गावे, १२३ वाड्यांमध्ये टंचाई?

Next

पोलादपूर : कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे. अगदी यंदाही नुकतेच जे टंचाईग्रस्त तालुके जाहीर झालेत, त्यात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याचा समावेश आहे. तालुक्याचे जलवैभव टिकवून ठेवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. यंदा पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
गत वर्षी एप्रिल ते जूनपर्यंत टंचाई निवारण कृती आराखड्यात २३ गावे आणि १६३ वाड्यांचा समावेश होता. मात्र, यंदा टंचाई आराखड्यात गावांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात महिला आणि ग्रामस्थांचे पाणीटंचाईमुळे अतोनात हाल होणार आहेत. यंदाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ गावे आणि १२३ वाड्यांची मागणी निश्चित करण्यात आली असून, १६९ ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ४२.२५ लाखांची तरतूद टंचाई आराखड्यात करण्यात आली आहे. दरम्यान, उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षी २३ गावे, ११८ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला होता. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून, महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.
मागील दहा वर्षांत गाववाड्यांवर विंधन विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, पाणी प्रश्न सुटला नाही.
।पाणीटंचाईने त्रस्त गावे
टंचाईग्रस्त ४६ गावांमध्ये चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, आड, कुंभळवणे, कुडपण खुर्द व बुद्रुक, तुटवली, क्षेत्रफळ, कोतवाल खुर्द व बु., तामसडे, बोरघर, काटेतळी, वाकण गावठाण, पितळवाडी, नानेघोळ, ओंबळी गावठाण, गोवले, खोपड, बोरज, कापडे खुर्द, कातळी बंगला, महाळुंगे, महालगुर, गोलदारा आदीचा समावेश आहे. तर तालुक्यातील १२३ वाड्यांमधील २० हजार ५४ लोकसंख्येला भासणारी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निवारण करण्याचे आव्हान उभे आहे.

Web Title: Poladpur in 5 villages, 5 wards in shortage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.