पोलादपूर बसस्थानक समस्यांच्या गर्तेत; प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:11 AM2021-04-06T00:11:14+5:302021-04-06T00:11:23+5:30

लांब पल्ल्यांच्या एसटीमुळे होते गर्दी; गाडी शोधताना होते धावपळ

Poladpur bus stand in the pit of problems; Travelers suffer | पोलादपूर बसस्थानक समस्यांच्या गर्तेत; प्रवासी त्रस्त

पोलादपूर बसस्थानक समस्यांच्या गर्तेत; प्रवासी त्रस्त

googlenewsNext

पोलादपूर : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे पोलादपूर बसस्थानक येथून तळ कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई, ठाणे, महाबळेश्वर आदी ठिकाणी धावणाऱ्या एसटी बसेसमुळे कोकणातील पोलादपूर बसस्थानक हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे मानले जाते. मात्र, हे बसस्थानक नेहमी समस्यांच्या गर्तेत अडकले आहे.

पोलादपूर बसस्थानकात असणारी कॅन्टीनमुळे या ठिकाणी बहुसंख्येने एसटी बस येथे थांबत असतात. मात्र, पोलादपूर स्थानकात लांब पल्ल्याच्या ज्या एसटी बसेसला थांबा देण्यात आला आहे. अशाच बस या स्थानकात थांबवाव्यात मात्र तसे न होता लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या सर्व एसटी बसेस या ठिकाणी चहा, नाश्ता व जेवणासाठी थांबत असल्याने या स्थानकात नेहमीच गर्दी होत असते. या ठिकाणी ग्रामीण एसटी बसेसच्या फेऱ्या, स्थानिक प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या बसमधील प्रवास करणारे प्रवासी यामुळे स्थानकात प्रचंड गर्दी होताना दिसून येते.

या गर्दीमुळे ग्रामीण भागातील असणाऱ्या एसटीच्या फेऱ्या आणि स्थानिक प्रवाशांना या गर्दीतून आपली बस शोधावी लागते आणि आपली बस कधीकधी चुकते त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना काही तास खोळंबा होऊन या मार्गावर जाणारी दुसरी बस शोधावी लागते. त्यामुळे स्थानिक प्रवासी जनतेतून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण
महाड आगार मार्फत पोलादपूर बसस्थानकात पुरविली जाणारी एसटी सेवा मात्र एसटी बसच्या जुनाट गाड्यांमुळे आणि पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले आहे ग्रामीण भागातील एसटी बसेस वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याने या विभागातून येणारे शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि प्रवासी जनता यांना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने किमान तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन चांगल्या नवीन एसटी बसेस या मार्गावर देऊन जनतेची गैरसोय टाळणे गरजेचे बनले आहे.

पोलादपूर स्थानकात जागेचा अभाव
महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे पोलादपूर स्थानक मात्र या स्थानकात जागा अतिशय कमी असल्यामुळे आणि ग्रामीण सर्वच लांब पल्ल्याच्या एसटी बसेस या ठिकाणी थांबत असल्याने प्रचंड गर्दीचे प्रमाण वाढलेले दिसून येते त्यातच गणेशोत्सव, शिमगोत्सव असे महत्त्वाचे समजले जाणारे कोकणातील सण - उत्सव आणि येणाऱ्या-जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती संख्या नेहमीच गर्दीचे प्रमुख कारण बनले आहे.

या स्थानकात असणारे शौचालय गेल्या महिन्यात महामार्गावरील कामामुळे रस्त्यावरील गटारात मातीचा भरव टाकल्यामुळे गटार तुंबून शौचालयाचे पाणी थेट बसस्थानक परिसरात वाहून जात असल्याने स्थानकात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.
त्यामुळे स्थानिक व्यावसायिक हातगाडी आणि टपरीधारक त्रस्त झाले होते. अशा एक ना अनेक समस्या या स्थानकात नेहमीच दिसून येत आहे.

Web Title: Poladpur bus stand in the pit of problems; Travelers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.