पोलादपूर-कशेडी बोगदा लवकरच; २५ किमीसाठी पर्यायी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:25 AM2018-04-17T02:25:34+5:302018-04-17T02:25:34+5:30

 Poladpur-Kabaddi tunnel soon; An alternative route for 25 kms | पोलादपूर-कशेडी बोगदा लवकरच; २५ किमीसाठी पर्यायी मार्ग

पोलादपूर-कशेडी बोगदा लवकरच; २५ किमीसाठी पर्यायी मार्ग

Next

- सिकंदर अनवारे

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडीपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर पोलादपूर ते कशेडी बोगद्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून बोगद्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. पनवेल ते इंदापूर हे काम रखडलेले असले तरी इंदापूर ते कशेडी हे दुसºया टप्प्याचे काम जोमाने सुरू आहे. हे कामदेखील एल अ‍ॅण्ड टी आणि महिंद्रा कंपनीने घेतले असल्याने काम दर्जेदार होईल, असा स्थानिकांना विश्वास आहे.
पोलादपूरजवळ भोगाव गावाजवळ बोगदा तयार करण्यात येत आहे. साधारण ११ किमीचा हा बोगदा असून, १६ मीटर रुंद आणि ११ मीटर उंचीचा बोगदा २०२०पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर ते कशेडी हे अंतर साधारण १४ किमी असून, हे अंतर घाट मार्गाचे आहे. घाटात असलेल्या वळणांमुळे या मार्गावर कायम अपघात होत असतात; शिवाय वेळ आणि इंधनही खर्च होत आहे.
घाट रस्त्यात धामनदिवी गावाजवळ रस्ता खचलेला आहे. यासाठी अनेक उपाय करूनही हा रस्ता दरवर्षी खचतोच. यामुळे पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद पडतो. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असतात. याला पर्याय म्हणून इंदापूर ते कशेडी यादरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात पोलादपूरजवळ भोगाव गावाजवळ एका बोगद्याचे काम केले जाणार आहे. यामुळे अंतर आणि इंधन बचत होणार आहे. घाट रस्त्याचे अंतर सुमारे १४ किमी असले तरी उंच घाट असल्याकारणाने वेळ आणि इंधन खर्च होतो. मात्र हा बोगदा झाल्यास हे अंतर ४ किमीने कमी होऊन बोगद्यातील अंतर जवळपास ११ किमी होणार आहे. यामध्ये तीन पदरी दोन बोगदे असून, एका जाणारा आणि एक येणाºया वाहनांसाठी असणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.

२५ किमीसाठी पर्यायी मार्ग
- महामार्ग विभागाने बोगद्याच्या कामासाठी ५०२ कोटींची निविदा काढली होती. मात्र रिलायन्स कंपनीने हे काम ४४३ कोटींना घेतले आहे, अशी माहिती महामार्ग विभागाच्या महाड कार्यालयाकडून मिळाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. कोकणात जाणाºया चाकरमान्यांचा प्रवासातील त्रास या मार्गामुळे कमी होणार आहे.
- इंदापूर ते कशेडी चौपदरीकरणाबरोबरच रत्नागिरी विभागात कशेडी घाट समाप्तीनंतर होणारे महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पोलादपूर ते कशेडी यादरम्यानचे किमान २५ किमीचे अंतर कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कशेडी बोगदा तयार केला जाणार आहे. मात्र दोन्ही भागांचे काम पूर्ण झाले तरी जोपर्यंत बोगदा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा मार्ग पूर्वीप्रमाणेच अपूर्ण राहणार आहे. मात्र रिलायन्स कंपनीने या बोगद्याचे काम घेतल्याने हे काम लवकर पूर्ण होऊन दोन्ही जिल्हे कमी अंतरात जोडले जाणार आहेत.

Web Title:  Poladpur-Kabaddi tunnel soon; An alternative route for 25 kms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड