लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: महाड तालुक्यात तळीये व पोलादपूर तालुक्यात केवनाळे आणि साखर सुतारवाडी गावावर २१ व २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली होती. यातील तळीये दरडग्रस्तांसाठी ६६ घरे बांधून पूर्ण झाली. ती दरडग्रस्तांना दिली, तर २०६ घरांची उभारणी सुरू आहे. मात्र, केवनाळे आणि साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. येथील काही ग्रामस्थ जुन्याच घरात जीव मुठीत घेऊन राहत आहेत, काहींनी शेजारच्या गावात आसरा घेतला असून, काहींनी मुंबई गाठली आहे.
गेल्या आठवड्यात दरडग्रस्तांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन पुनर्वसनाबाबतची मागणी केली. तीन वर्षे उलटूनही या गावांच्या पुनर्वसनाबाबत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आमची घरे कधी बांधून देणार, असा सवाल दरडग्रस्तांकडून उपस्थित होत आहे.
२४ जुलै २०२३ रोजी केवनाळे आणि साखर सुतारवाडी येथील १७२ घरांसाठी ३ कोटी ९५ लाख ६० हजार इतका निधी घरबांधकामास मंजूर केल्याचे परिपत्रक काढले होते. मात्र, वर्ष उलटूनही प्रत्यक्ष घरबांधकामास सुरुवात झाली नाही. मात्र, याठिकाणी शाळा, अंगणवाडी बांधण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. २२ जुलै २०२१ रोजी महाड, पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी गावांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत ९८ जणांचा मृत्यू झाला होता. येथील १७२ कुटुंबांचे पुनर्वसन प्रशासनाकडून केले जाणार होते.
केवनाळे गावची स्थिती
- केवनाळे येथील १६३ कुटुंबे आहेत. १२८ घरांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या कुटुंबांच्या घरासाठी ९ खासगी व्यक्तींची ३.७६.९१ हे. आर. जागा प्रस्तावित आहे.
- जागेची पाहणी करून भूवैज्ञानिकांकडून तपासणी करून घेतली आहे. ती पुनर्वसनासाठी योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. पुनर्वसन जागेचा लेआउट नगररचना विभागाने मंजूर केला आहे.
- खासगी एजन्सीमार्फत सीमांकनही केले आहे. पुनर्वसन जागेचा ताबा प्रशासनाने घेतला असून, जागामालकांना मोबदलाही दिला आहे. केवनाळे येथील भूसंपादनासाठी ६४ लाख २६ हजार रुपये निधी मंजूर केला होता.
साखर सुतारवाडी गावची स्थिती
- साखर सुतारवाडी येथे ३८ कुटुंबे आहेत. ४४ घरे बांधली जाणार आहेत. यासाठी २.२७.९० हे. आर. खासगी जागा पुनर्वसनासाठी निश्चित केली आहे.
- जागा प्रशासनाने ताब्यात घेतली असून, नगररचना विभागाने लेआउट तयार केला आहे. भूसंपादनासाठी ३८ लाख ४१ हजार ७८६ रुपये निधी मंजूर केला होता.
- केवनाळे येथील प्रत्येक कुटुंबाला दीड गुंठे, तर सुतारवाडी येथील कुटुंबाला तीन गुंठे जागा दिली जाणार आहे.