पोलादपूर ग्रामीण रुग्णालय सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:11 AM2021-04-24T01:11:03+5:302021-04-24T01:11:08+5:30
तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी कोविड रुग्णालयात पाठविल्याने गैरसोय
प्रकाश कदम
लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वपूर्ण समजले जाणारे पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालय असून या रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असल्याने आणि रिक्त पदांमुळे अतिरिक्त भार कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडत आहे; यामुळे ग्रामीण जनतेला सोयीसुविधा कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे पोलादपूर येथील अधिकारी डॉ. पाटील यांच्याकडे महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरची मुख्य जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत इतर कर्मचारीदेखील असल्याने आधीच कमी कर्मचारी असताना तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व सहकारी कोविडला दिल्याने ग्रामीण रुग्णालय सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण रुग्णालयात कोविड १९ वर लस देण्यात येत आहे मात्र तालुक्यातील नागरिकांना प्राधान्य न देता ग्रामीण रुग्णालयात महाड औद्योगिक वसाहतीमधील रहिवासी महाडमधील रहिवासी यांना प्राधान्य देण्यात येत असल्याने स्थानिक नागरिक लसेपासून वंचित राहत आहेत. अनेकांना लस मिळाली नसून रोजच फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. पोलादपूर तालुक्यातही दिवसागणिक १० ते १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र या ठिकाणी सीरिअस केसेस आणि कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन लाईन नसल्याने तालुक्यातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभाग सतर्क झाला असला तरी ठिकठिकाणी आधुनिक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. शासनाने तत्काळ विचारात घेऊन या रुग्णालयात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.
रुग्णालयात अनेक पदे रिक्त; कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार असल्याने रुग्णांचे हाल
याबरोबरच या रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असून सद्य:स्थितीत १ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत, तर १ वैद्यकीय अधिकारी डेप्युटेशनसाठी महाड येथे कार्यरत असून, एक पद रिक्त आहे. यामुळे येथील कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी भूलरोगतज्ज्ञ हे पद गेली कित्येक वर्षे रिक्त आहे; तसेच एक्स-रे टेक्निशियन, नेत्रचिकित्सा टेक्निशियन, कक्ष सेवक २ पदे, ऑफिस सेवक पद रिक्त, आयुर्वेद आयुष डॉक्टर हे पददेखील रिक्त असल्याने या रुग्णालयातील रिक्त पदे शासनाने तत्काळ भरावीत व तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
सोयी-सुविधांचा अभाव
nपोलादपूरसारख्या अतिदुर्गम डोंगरभागातील या रुग्णालयात लागणाऱ्या अत्यावश्यक सोयीसुविधा शासनाने पुरविणे गरजेचे असतानाही गेली अनेक वर्षे शासनाकडून या रुग्णालयाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही; यामुळे अनेक पदे रिक्त असून, या रुग्णालयात सोयी-सुविधांचा नेहमीच अभाव असल्याने गोरगरीब जनतेला पाहिजेत अशी सुविधा तत्काळ प्राप्त होत नाही; यामुळे तालुक्यातील जनतेकडून शासनाच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
nलसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत कोविशिल्डचा प्रथम डोस १५०६ व दुसरा डोस ६०६ जणांना, तर कोवॅक्सिनचा प्रथम डोस ८३३ व दुसरा डोस २३ जणांना देण्यात आला आहे. तालुक्यातील बहुतांश नागरिक दुर्गम भागात राहत असल्याने अनेकदा त्यांना परत जावे लागत आहे. लस कोणीही, कुठेही घेऊ शकत असला तरी ज्या तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आहे, त्या तालुक्यातील नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.
nपोलादपूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये सद्य:स्थितीत आंतररुग्ण व बाह्यरुग्ण कक्ष सुरू असून यासाठी लागणारा औषधसाठा परिपूर्ण असून श्वानदंश, सर्पदंश यांसाठी अत्यावश्यक असणारी औषधे उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक भाग्यश्री पाटील यांनी दिली आहे.