पोलादपूर : तालुक्यातील कातळी बंगला ते पळचिल ग्रामीण रस्ता क्रमांक २० वरील दोन किलोमीटर अंतरावर संपूर्ण डांबर व खडी उखडून, मोठमोठे खड्डे पडून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक वेळा दुचाकी घसरून अपघात झाले आहेत, तर शाळकरी विद्यार्थी सायकलने प्रवास करताना रस्त्यावर पडल्याने जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, संबंधित खात्याकडून खड्डे बुजविण्याची तसदी घेण्यात येत नसल्याने या विभागातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत.या रस्त्यावर पायी चालणेही धोक्याचे बनले आहे, अनेक वेळा दुचाकी घसरून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर सर्वत्र खडीचे साम्राज्य पसरले होते. मात्र, विभागात कार्यरत असणाऱ्या माध्यमिक शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी मंगळवारी श्रमदान करून रस्त्यावर पसरलेली अस्ताव्यस्त खडी बाजूला करून टिकाव, फावडे, घमेल्याने माती टाकून खड्डे बुजले आहेत. या वेळी शाळा समिती अध्यक्ष उमेश मोरे, शा. व्य. अध्यक्ष नारायण मोरे, ग्रामस्थ सुनील जाधव, संदीप जाधव, मुख्याध्यापक विनिता पवार, प्रल्हाद चिविलकर, माहिपतराव कोकरे, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदीनी श्रमदान करून रस्त्यावर विखुरलेली खडी, दगड, गोटे उचलून रस्ता रहदारीयोग्य के ला आहे,यामुळे शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामाची दखल घेत समाजसेवक रवींद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपाहार बिस्किट पुडे वाटप केले.रस्त्याची दुरु स्ती करण्याची मागणीपळचिल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक, माध्यमिक शाळा असून, या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. मात्र, खड्डे पडून आणि रस्त्यावर खडी अस्ताव्यस्त पसरल्याने या मार्गावरून पायी चालणेही जिकिरीचे बनले आहे, तसेच तीव्र चढ-उतार वेडी वाकडी वळणे असल्याने एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत, या रस्त्यावर पुढे खडकवणे ते गोलदारापर्यंत हीच अवस्था झाली असल्याने संबंधित खात्याच्या कारभाराबाबत या विभागातील ग्रामस्थ व उपसरपंच उमेश मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.ं
पोलादपूरमध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी बुजवले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:54 AM