पोलादपूर तलाठी कार्यालयाचे बिल थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 02:03 AM2019-11-14T02:03:20+5:302019-11-14T02:03:22+5:30
पोलादपूर शहरात बाजारपेठेत असलेल्या तलाठी सजा कार्यालयातील विद्युतपुरवठा जवळपास गेल्या १५ दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे.
प्रकाश कदम
पोलादपूर : पोलादपूर शहरात बाजारपेठेत असलेल्या तलाठी सजा कार्यालयातील विद्युतपुरवठा जवळपास गेल्या १५ दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. मार्च २०१९ पासून ४,१३० रुपये थकीत वीजबिलाबाबत संबंधित यंत्रणेला वारंवार सूचित करण्यात आले. मात्र, तरीदेखील वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की महसूल विभागावर ओढवल्याची समजते.
पूर्वी या तलाठी सजा कार्यालयाचे बिल तहसील कार्यालयमार्फत भरले जात असे, त्यानंतर तलाठी व सर्कल हे कॉन्ट्रिब्युट करून बिल भरत असत; पण हा वीज भरणा न झाल्याने महावितरणतर्फे विद्युतपुरवठा थकीत बिलाबाबत संबंधित यंत्रणेला वारंवार सूचित करण्यात आले; परंतु महावितरणच्या बिल भरण्याकडे दुर्लक्ष करत या यंत्रणेने आपला कारभार चालूच ठेवला, महावितरणकडून १५ दिवसांपूर्वी कारवाईची नोटीस बजावण्यात आली. मात्र, बिल न भरल्यामुळे महावितरणला येथील विद्युतपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे तलाठी कार्यालयात शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना विनालाइट व विनापंखा उकाड्यामध्ये बसावे लागत आहेत.
पोलादपूर बाजारपेठेत रस्त्यालगत असणारे तलाठी सजा कार्यालय येथे जमीन विषयक विविध कामांसाठी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ व महिला मोठ्या संख्येने येत असतात आणि त्यातच शेतीविषयक शासनाचा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीही नागरिक तलाठी कार्यालयात येत असतात. गेल्या १५ दिवसांपासून मात्र अधिकाºयांच्या हलगर्जीमुळे तलाठी सजा कार्यालयात येणाºया नागरिकांना याची विनाकारण शिक्षा भोगावी लागत आहे.
>वीज नसल्याने रखडली कामे
१५ दिवसांपासून कार्यालयातील वीजपुरवठा थकलेल्या बिलामुळे खंडित करण्यात आलेला आहे, त्यामुळे वीज नसल्याने अनेक कामे रखडत असून, नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. भरउन्हात विनापंख्याचे उकडून निघावे लागत आहे. या उकड्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी बाहेर आजूबाजूला सावलीत तलाठी कार्यालयातील कर्मचाºयांची वाट बघत बसावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून या हलगर्जीबद्दल नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यामुळे तातडीने वीजबिल भरून पुरवठा सुरळीत केला जावा, अशी मागणी होत आहे.