पोलादपूर : दिवसा गरमी आणि सायंकाळी परतीच्या पावसाचा तडाखा पोलादपूरकरांना सोसावा लागत आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्मिती होऊन दुपारी ४ नंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा सामना करावा लागला आहे. कशेडी परिसरासह कापडे, कामथे, तुर्भे, कोतवाल विभागात दमदार पाऊस कोसळला आहे, त्यामुळे तालुक्यात काही ठिकाणी भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
शनिवारी दुपारी ४ वाजता पावसाला सुरुवात झाली ते साधारण दोन तास पाऊस धो धो कोसळलेल्या पावसात उशिरापर्यंत कोणतेही नुकसानीचे वृत्त हाती आले नाही. गेले आठ दिवस आॅक्टोबर हिट सारखा गरमा जाणवत असताना नागरिकांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत असताना मात्र शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले, तर सायंकाळी बाजारपेठमध्ये शुकशुकाट होता.
अचानक कोसळलेल्या पावसाने अनेकांची धांदल उडाली. त्यातच नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित होऊन बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढले. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. शेतकरी बांधवांनी भात कापले असून, ते पावसात भिजल्याने तांदूळ खराब होतो. त्यामुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे.