मोहोपाडा : पंचायत समितीच्या निधीतून वासांबे मोहोपाडा हद्दीतील नवीन पोसरी येथील माउली अपार्टमेंटनजीकच्या चौकात एलईडी हायमास्ट लाइटचा पोल अचानक गायब झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या हायमास्टची वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे देखभालीची जबाबदारी असतानाही असा प्रकार घडल्याने असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी नागरिक मागणी करीत आहेत.
रसायनीतील वासांबे मोहोपाडा व नवीन पोसरी हे परिसरातील मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू आहे. नवीन पोसरी येथील माउली अपार्टमेंट चौकात याअगोदर नागरिकांच्या आग्रहाखातीर येथील स्थानिक पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून एलईडी हायमास्ट पोल लावल्याने परिसर प्रकाशमय झाला होता. पोलची जबाबदारी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे होती. परंतु नुकताच हा पोल गायब झाला आहे. यामुळे रात्री या चौकातून प्रवास करताना महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एका परिसरातील नागरिकांना प्रकाश दाखवून दुसऱ्या परिसरातील नागरिकांना अंधारात ठेवणे हे कितपत योग्य? असा सवाल केला जात आहे? वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने सदर हायमास्ट एलईडी लाइट व पोल चोरणाऱ्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवीन पोसरी चौकातील हायमास्टची देखभालीची जबाबदारी ही वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे असल्याने हायमास्ट गायब करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, असे ग्रामपंचायतीकडून रसायनी पोलीस ठाण्याला पत्र देण्यात येईल. -सरपंच ताई पवार