वसईत रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहनांवर पोलिसांची कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:34 PM2020-11-09T23:34:48+5:302020-11-09T23:34:57+5:30
गेल्या चारपाच दिवसांपासून अशा गाड्या उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नालासोपारा : वसई-विरार शहरांतील गर्दी होणाऱ्या रस्त्यांच्या कडेला हजारो बेवारस आणि भंगार वाहनांमुळे नागरिकांना चालण्यास त्रास सहन करावा लागत आहे. या गाड्यांमुळे वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या वाढली आहे. यामुळे गेल्या चारपाच दिवसांपासून अशा गाड्या उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी आणि नो-पार्किंग झोनमध्ये अनधिकृतपणे वाहने पार्क केली जातात, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश जाहीर केला होता. वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे पार्किंग झोन नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई कशी करावी, हा प्रश्न पडला होता. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतरही वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कडेला अशी वाहने बिनधास्तपणे पडलेली असूनही वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, चारपाच दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशी वाहने उचलण्यास सुरुवात केली आहे.
वसई, विरार, नालासोपारा या शहरांतील अनेक रस्त्यांच्या कडेला कित्येक महिन्यांपासून भंगार गाड्या पडलेल्या असल्याने सर्वत्र घाण पसरत होती. नागरिक या भंगार गाड्यांवर कचऱ्याच्या पिशव्या फेकत होते. साफसफाई कर्मचारी हे कचरा उचलत नसल्याने कचरा सडून दुर्गंधी पसरली असल्याने मच्छरांची पैदाससुद्धा वाढली होती.