अलिबाग: जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असताना पोयानाड येथे कामानिमित्त जाताना कार चालकाने मोटार सायकलला धडक देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दारा सिंग पावरा यांचा अपघात झाला. अपघातानंतर पावरा यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे त्याच्या कुटुंबावर व पोलीस दलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघात करून कार चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दारासिंग पावरा हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असून पोलीस म्हणून रायगड दलात सेवेत होते. नुकतेच त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली होती. अलिबाग पोलीस मुख्यालयात हे आपले कर्तव्य बजावत होते. गुरुवारी सायंकाळी अलिबाग वडखळ रस्त्याने पावरा आपल्या मोटार सायकलवरून पोयनाड येथे जात असताना मागून आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेने पावरा हे खाली पडून त्याच्या डोक्याला मार लागला. अपघाताची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अपघात करून कारचालक हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अपघाताची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघातबाबत माहिती घेतली. पावरा याच्या कुटुंबाचे सात्वन करून तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असा धीर दिला. पावरा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पावरा यांच्यावर त्याच्या गावी नंदुरबार येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.