पोलीस बनले देवदूत
By admin | Published: July 6, 2016 02:28 AM2016-07-06T02:28:37+5:302016-07-06T02:28:37+5:30
प्रसूतीच्या असह्य कळा...धोधो पाऊस आणि रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने महामार्गावरच अडकून पडलेल्या महिलेच्या मदतीला महामार्गावर गस्त घालणारे पोलीस देवदूत बनून
- अंकुश मोरे, वावोशी
प्रसूतीच्या असह्य कळा...धोधो पाऊस आणि रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने महामार्गावरच अडकून पडलेल्या महिलेच्या मदतीला महामार्गावर गस्त घालणारे पोलीस देवदूत बनून धावून आले. त्यांनी वेळेत रुग्णालयात पोहचण्यास मदत केल्यामुळेदोन जीव वाचले.
मूळचे लातूर येथील हनुमंत लिंबोळे खालापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गानजीक एका खडी मशीनवर कामास आहेत. शनिवारी दुपारी हनुमंत यांची पत्नी पूजा हिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. मात्र काम करत असलेले ठिकाण लोकवस्तीपासून दूर असल्यामुळे त्याठिकाणी वाहनाची सोय नव्हती. रुग्णालयात जाण्यासाठी अखेर हनुमंत यांनी पत्नीसह महामार्ग गाठला. एखादे वाहन मिळाल्यास खालापूर येथील दवाखान्यात जाता येईल असा विचार केला. महामार्गावर तासभर थांबून सुद्धा एकही वाहन मदतीला थांबले नाही. एकीकडे मुसळधार पाऊस आणि असह्य प्रसूती वेदना यामुळे पूजावर बिकट प्रसंग ओढावला होता. यावेळी चौक खालापूरकडे जाणाऱ्या पोलीस व्हॅनची नजर मदत मागणाऱ्या हनुमंत यांच्यावर पडली. पूजाची अवस्था पाहून पोलीस व्हॅनमधून खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु तोपर्यंत पूजाची अवस्था गंभीर झाली होती.
पोलीस व्हॅनने पूजाला वेळेवर दवाखान्यात आणले. थोडा उशीर झाला असता तर पूजाची रस्त्यातच प्रसूती झाली असती आणि गंभीर प्रसंग ओढावला असता.
- डॉ. बालाजी चौरे,
वैद्यकीय अधिकारी,
खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र