कर्जत : भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात पोलीस चौकीची आवश्यकता आहे. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर जागा उपलब्ध करून दिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून व भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात पोलीस चौकी उभारू, असे मुंबईच्या आरपीएफ कार्यालयातून लेखी स्वरूपात कळविले आहे.भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी या स्थानकात प्रवाशांची एवढी वर्दळ नव्हती; परंतु या परिसरात महाविद्यालये सुरू झाल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या खूपच वाढली. विशेषत: विद्यार्थी प्रवासी वाढले. त्यातच चाकरमानी व व्यावसायिक प्रवासीसुद्धा कालानुरूप वाढली आहे. पावसाळ्यात या परिसरात धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. भिवपुरी रोड रेल्वेस्टेशनवर कर्मचाºयांच्या उपलब्धतेनुसार कर्जत जीआरपी कार्यालयात प्रतिदिन कर्मचारी पाठवले जातात. मात्र, या रेल्वेस्थानकात पोलीस चौकीची अत्यंत आवश्यकता भासू लागली आहे.या परिसरातील काही प्रवाशांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत असलेले सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांची भेट घेऊन पोलीस चौकी होण्याबाबत चर्चा केली. ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला व त्याचा पाठपुरावा केला. या संबंधात निरीक्षक, कर्जतचे वरिष्ठ निरीक्षक, जीआरपी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय उच्च अधिकारी स्तरावर असल्याचे सांगण्यात आले. ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे पत्रव्यवहार केला. त्यांनी रेल्वे स्थानकात जागा उपलब्ध करून दिल्यास पोलीस चौकी सुरू करू, असे लेखी उत्तर कळविले आहे. जागा उपलब्ध करून देण्याबाबतही ओसवाल यांनी संबंधितांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात पोलीस चौकीची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या स्थानकात लवकरात लवकर जीआरपीना जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली आहे. जागा उपलब्ध होईपर्यंत आपण पाठपुरावा सुरू ठेवू.- पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत
भिवपुरी रेल्वेस्थानकात जागा उपलब्ध केल्यास पोलीस चौकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:59 PM