निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग - रायगड जिल्हा पोलीस हद्दीतील कर्जत, नागोठणे, नेरळ, पोयनाड, मांडवा सागरी, रेवदंडा, महाड, वडखळ, गोरेगाव, रसायनी, मुरुड, खोपोली अशा १२ पोलीस ठाण्यांमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत १५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले ८ लाखाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा येथे नष्ट करण्यात आले.
मागील काही दिवसामध्ये पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेले एकूण ५२ किलो ३९ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, त्यामध्ये ५० किलो ९९२ ग्रॅम गांजा आणि १ किलो ४७ ग्रॅम चरस, ज्याची एकूण किंमत ८ लाख, 48 हजार, 18 रुपये इतकी आहे, तो मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड, तळोजा, नवी मुंबई येथे कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मंगळवारी (१५ एप्रिल) नष्ट करण्यात आला.
ही कार्यवाही एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ५२ अ (२) नुसार करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय तथा पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यासह न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा, कलीना, मुंबईचे सहायक रासायनिक विश्लेषक अ. स. गावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर, वैद्यमापन शास्त्र, अलिबाग विभाग रायगड निरीक्षक सुरेश देवकाते तसेच दोन शासकीय पंच उपस्थिती होते.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधातील धोरणबद्ध प्रयत्नांचे उदाहरण असून, यामुळे जिल्ह्यातील समाजातील सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.