निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनानंतरचे नवे पर्व आणि नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी अनेक जण तयारी करीत असताना या संधीचा आर्थिक फायदा घेण्यासाठी मुंबईतील काही ड्रग्स पेडलर्स रायगड जिल्ह्यात आपले हातपाय पसरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
रायगडपोलिसांनी यासाठी तीन स्तरावर कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. २० दिवसांपूर्वी दिव-दमन येथून मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पनवेल आणि अलिबागमध्ये एकूण चार जणांना अटक केल्यानंतर अमली पदार्थ आणि मद्याचा साठा करणाऱ्यांवर रायगड पोलिसांची बारिक नजर असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील अनेक सिनेस्टार, व्यावसायिकांचे फार्म हाउसेस, रायगड जिल्ह्यात आहेत. या धनाढ्य लोकांकडून अमली पदार्थांना मागणी जास्त असते.
मुंबईतील सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थांविरोधात नार्कोटिक्स विभागाने अनेक कलाकारांसह त्यांना अमली पदार्थ पुरवणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे मुंबईतील धास्तावलेले ड्रग्स पेडलर रायगड जिल्ह्यात आपले बस्तान मांडू शकतात, अशा संशय रायगड पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने खालापूर येथे केलेल्या जुगार अड्ड्यावरील कारवाईला महत्त्व आले आहे
नवे वर्ष सुरू होण्यास तीन दिवस शिल्लक आहेत, परंतु येथील पर्यटन व्यावसायिकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. दरवर्षी रायगडमध्ये होणाऱ्या थर्टीफर्स्टसाठी मद्याचे सेवन, अमली पदार्थांचा वापर सर्रास केला जातो. या वर्षी मुंबई-पुण्यातील पर्यटक दूर न जाता अलिबागमध्ये पार्ट्या आयोजित करण्याच्या बेतात आहेत. यासाठी बुकिंगही सुरू झाली आहे. नेहमीपेक्षा या वर्षी ग्राहकांच्या मागण्या वेगळ्या असून, वर्षभरातील अनेक चढउतार, आर्थिक मंदी, लॉकडाऊनमुळे आलेला मानसिक ताण घालविण्यासाठी नशेच्या पदार्थांची विचारणा होऊ लागली आहे.
रायगड जिल्ह्यात फक्त नोव्हेंबरमध्ये नशेच्या पदार्थांचा व्यवसाय करोडोंच्या घरातला असतो. चोरी-छुपे चालणाऱ्या या व्यवसायावर पायबंद घालण्यासाठी अनेक उपाययोजना रायगड पोलीस दरवर्षी घालण्याचा प्रयत्न करीत असतात. तरीही ग्राहकांची प्रचंढ मागणी आणि कमी कालावधीत दामदुप्पट नफा मिळत असल्याने, अनेक व्यावसायिक बनावट दारू विकणे, दिव-दमण, गोवा या राज्यातून कमी किमतीत दारू आणून विकणे, चरस-गांजा यासारख्या अमली पदार्थांचा साठा करणे यासारखे प्रकार सुरू केले असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी रायगड पोलीसकरीत आहेत.