पोलिसांचा गोळीबाराचा सराव ग्रामस्थांच्या जीवावर; खिडकीतून गोळ्या घुसल्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 11:23 PM2019-02-01T23:23:12+5:302019-02-02T06:53:45+5:30
मुलगी बचावली; ग्रामस्थांमध्ये भीती
अलिबाग : तालुक्यातील परहूर पाडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर सुरू असलेल्या सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेली गोळी थेट घरात घुसली. घरात राहणाऱ्या मुलीच्या अगदी जवळून बंदुकीची गोळी गेल्याने ती थोडक्यात बचावली आहे. कार्ले गावामध्ये सातत्याने असा थराररक घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सराव मैदान आणि गावाच्या मध्ये मोठी संरक्षक भिंत उभारून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पोलिसांना अचूक निशाणा साधण्यासाठी सरावाची गरज असल्याने सरावासाठी परहूर पाडा येथे पोलीस सराव मैदान उभारण्यात आले. हे मैदान कुलाबा जिल्हा अस्तित्वात असानाच पोलीस विभागाने निर्माण केले होते. सध्या याच सराव मैदानावर राज्यातील पोलीस गोळीबार करण्याचा सराव करतात. सराव मैदानाच्या बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या पलीकडे कार्ले गाव आहे. या गावामध्ये सुमारे सव्वादोनशे घरे आहेत. गुरुवारी सायंकाळी पोलिसांचागोळीबार करण्याचा सराव सुरू असताना बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या कार्ले गावातील विजय पाटील यांच्या घरातील खिडकीच्या काचा फोडून घरात घुसल्या. बंदुकीतून सुटलेली गोळी पाटील यांच्या मुलीच्या अगदी जवळून गेली. त्यामध्ये ती थोडक्यात बचावली. सुरुवातीला त्यांना वाटले की घरावर कोणी तरी दगड मारला असेल; परंतु घरात बंदुकीची गोळी सापडल्याने प्रकार उघड झाला. अशाच अन्य गोळ्या गावात आढळून आल्या आहेत. काही गोळ्या या डोंगरातील दगडांवर आपटून वाकड्या होऊनही गावात घुसल्या, त्यामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
गावातील अन्य ठिकाणीही गोळ्या सापडल्याने गावातील लोक एकत्र जमा झाले. त्यांनी तातडीने सदरची घटना सरपंचाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अलिबाग पोलिसांना कळवण्यात आले. शुक्रवार अलिबाग पोलिसांनी पाटील यांच्या घराची पाहणी करून पंचनामा केला, तसेच बंदुकीची गोळीही ताब्यात घेतली.
सुदैवाने हानी झाली नाही
बंदुकीतून सुटलेली गोळी माझ्या बहिणीच्या अगदी जवळून गेली, सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. दोन गोळ्या सापडल्या आहेत, अजून एक गोळी घराच्या पत्र्यावर अडकल्याची शक्यता आहे, असे स्वप्निल पाटील याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अशा घटना नेहमीच या भागात घडत असल्याने कार्ले गावातील ग्रामस्थ हे भीतीच्या छायेत आहेत. पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे स्वप्निल याने स्पष्ट केले.
कार्ले गावातील विजय पाटील यांच्या खिडकीतून बंदुकीची गोळी घरात आल्याने कार्ले गावात भीती निर्माण झाली आहे. पोलिसांचा गोळीबार सराव ज्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणी सरकारने मोठी संरक्षक भिंत उभारल्यास सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या अन्य ठिकाणी घुसणार नाहीत, अशी मागणी विजय पाटील यांनी केली आहे.
विजय पाटील यांच्या घरातील गोळी एके-४७ या शस्त्रातील एके-४७ या शस्त्रातून गोळीबार करण्याचा सराव परहूर पाडा येथील पोलीस सराव मैदानावर सुुरू आहे. गुरुवारी पाटील यांच्या घरामध्ये घुसलेली गोळीही त्याच अत्याधुनिक शस्त्रातील असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांचा सराव गुरुवारी सुरू होता. एके-४७ या शस्त्रातून गोळीबार करण्याचा सराव सुरू असताना काही गोळ्या समोरील डोंगरावर आदळून कार्ले गावाच्या दिशेने घुसल्या आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सराव कराताना काळजीपूर्वक करावा, तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.