दासगाव : गणेशोत्सवामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी मुंबई-गोवा महामार्गावर होत आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा, या निमित्ताने महामार्ग वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने पळस्पे ते कोकणाच्या तळापर्यंत जवळपास ७०० पोलीस कर्मचारी आणि ५१ अधिकारी तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
मुंबई - गोवा राष्टÑीय महामार्ग हा कोकणात जाण्याचा जवळचा मार्ग आहे. मात्र, रुंदीकरणाचे काम, खड्डे आणि वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. सध्या मुंबई ते कोकण हा वाहनप्रवास महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठा डोके दुखी बनला आहे. तासाच्या प्रवासाला चार आणि पाच तास लागत आहेत. त्याचप्रमाणे चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम सुरू झाले असून ते देखील अपूर्ण असून अनेक ठिकाणी प्रवासाला अडथळा निर्माण करणारे ठरत आहेत. त्यामुळे यंदा महामार्ग वाहतूक शाखेच्या पोलीस बंदोबस्तापेक्षा यंदा मोठी वाढ करण्यात आलेली आहे.
पनवेल पळस्पे ते कोकणाच्या तळापर्यंत पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, हातखांबा, चिपळूण आणि कसाल अशा सात वाहतूक शाखा (एक चेकपोस्ट) आहेत. जवळपास ५५० किमीच्या अंतरात महामार्गावर गणपती सण संपेपर्यंत ७०० पोलीस कर्मचारी आणि ५१ वरिष्ठ अधिकारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सात शाखेअंतर्गत अनेक ठिकाणी पॉइंट नेमून दिले असून त्या पॉइंटवर सण संपेपर्यंत रात्रंदिवस पोलीस तैनात राहणार आहेत.
महामार्ग, प्रमुख रस्त्यांवर मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत. गुरुवारपासून महामार्गावर रात्री १२ वाजल्यापासून अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी रस्त्यांचे काम चालू असल्याने रस्त्यावरील वाहतूक फलकावरील सूचनांचे अवलोकन करून मार्गक्रमण करावे. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.- योगेश गायकवाड,उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक, महाड