बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून पुढाकार घेण्यात आला असून बिरवाडी ग्रामपंचायतीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.बिरवाडीमधील नागरिकांच्या मागणीनुसार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारी बिरवाडी पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील गुन्हेगारीला आळा बसत असून बिरवाडी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता बिरवाडी मधील मिनिडोर चालक मालक संघटना, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना ,ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने कारण्यात आले आहे.महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत ३९ ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र येत असून बिरवाडीमध्ये मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका व शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते, यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भभवते. त्यातच मोकाट गुरे रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ही समस्या सोडविण्याकरिता नागरिकांना विश्वासात घेऊन पोलीस प्रशासनाच्यावतीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून बेशिस्त वाहन चालकांविरोधात कारवाई करणार असल्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी स्पष्ट केले आहे .
बिरवाडीमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:41 AM