गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:17 AM2017-08-04T02:17:09+5:302017-08-04T02:17:11+5:30
गणेशोत्सव कालावधीत डीजेचा आवाज दाबण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विविध गणेश मंडळांना ताकीद दिली आहे.
अलिबाग : गणेशोत्सव कालावधीत डीजेचा आवाज दाबण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विविध गणेश मंडळांना ताकीद दिली आहे. त्यामुळे कायदा मोडणाºया गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
२५ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरु वात होणार आहे. त्यामुळे विविध गणेश मंडळांची लगबग सुरु झाली आहे. दुसरीकडे गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी विविध मंडळांच्या पदाधिकाºयांबरोबरच बैठका घेण्यास सुरु वात केली आहे. अलिबाग पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना सूचना दिल्या आहेत. पोलीस निरीक्षकांनी ध्वनिप्रदूषण आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेश मंडळांना आवाहन करून चांगले सहकार्य करणाºया मंडळांचा रायगड पोलिसांमार्फत गौरव करण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.
डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे अनेक गंभीर परिणामांसह उच्च रक्तदाब, कायमचा बहिरेपणा तसेच वृद्ध व लहान मुलांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे शहरातील डीजे चालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ध्वनिप्रक्षेपक ठरवून दिलेल्या मर्यादेत वाजविणे गरजेचे असल्याचे वराडे यांनी सांगितले. डीजेच्या ध्वनिप्रदूषणावर अंकुश लावण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व डीजे चालकांना ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ध्वनिप्रदूषण करू नये व नियमाप्रमाणे आवाज मर्यादेचे उल्लंघन करू नये. यासाठी सीआरपीसी कलमानुसार प्रतिबंधक नोटीस देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेश मंडळांनी डी.जे. वाजवून ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पाच वर्षांपर्यंत कैद व एक लाख रु पये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. म्हणून ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून पारंपरिक वाद्य नियमांच्या अधीन राहून वाजवावेत आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वराडे यांनी केले.