पोलीस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:58 AM2020-02-19T01:58:59+5:302020-02-19T01:59:04+5:30
सहा महिन्यांपासून रखडले : तळा तालुक्यात २९ पोलीस पाटील
तळा : प्रत्येक गावपातळीवर तंटे, हत्या, मारामारी, व शांतता राखण्याबाबत पोलीस ठाण्यास प्रथम माहिती देण्याची जबाबदारी असणारे पोलीस पाटील गेल्या सहा महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. पोलीस पाटलांना दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळत होते. परंतु, ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार पोलीस पाटलांच्या मानधनात ३ हजार ५०० रुपयांची वाढ करून प्रतिमहिना ६ हजार ५०० रुपये मानधन केले. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पोलीस पाटलांच्या मानधनासाठी ११७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, अर्थसंकल्पानंतर पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ झाल्याने निधीअभावी नियमित मानधन देण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे.
तळा तालुक्यात २९ पोलीस पाटील कार्यरत आहेत नेहमीच पोलिसांच्या दिमतीला राहणारा हा पोलीस पाटील गावातील संभाव्य घडामोडींची गोपनीय माहिती काळविण्याचीही जबाबदारीही पार पाडतो. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस पाटलांना मानधनापासून वंचित राहावे लागल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे निधीची तरतूद करून लवकरच मानधन सुरू करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेकडून करण्यात येत आहे.
आज गेले सहा महिने पोलीस पाटलांना मानधन मिळाले नसल्यामुळे मानधनावर निर्भर असणाऱ्याची आर्थिक कुचंबणा होत आहे शासनाने लवकर पोलीस पाटलांचा मानधनाचा प्रश्न मार्गी लावून मानधन सुरळीत सुरू करावे.
- कमलाकर मांगले,
महाराष्ट्र राज्य सचिव पोलीस पाटील संघटना