मधुकर ठाकूर, उरण : शासनाकडून राज्यातील पोलिस पाटलांना देण्यात येणारे साडेसहा हजार रुपयांचे मानधन महागाईच्या दृष्टीने फार कमी आहे. त्यामुळे पोलीस पाटलांच्या मानधन वाढीचा आणि इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांनी चिरनेर येथील आयोजित बैठकीतून केली. न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.चिरनेर येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात रविवारी (१) महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
या सभेत बोलताना पंढरीनाथ पाटील यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पाटील हे पोलीस यंत्रणेला कायमच मदत करीत असतात. प्रशासन व समाज यामधील पोलीस पाटील हा दुवा आहे. त्यामुळे पोलीस पाटील यांची कामगिरी आणि कार्यक्षमता यांचे मूल्यांकन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.यावेळी शासनाच्या धोरणावर त्यांनी जोरदार आसुड ओढताना पूर्वीच्या काळात पोलीस पाटील हे तूटपूंज्या मानधनावर आपले कुटुंब चालवत होते. मात्र बऱ्याच वर्षांनी पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ झाली आहे. सध्या मिळणारे मानधन साडेसहा हजार रुपयांचे असले तरी हे मानधन महागाईच्या दृष्टीने फारच कमी आहे. त्यामुळे शासनाने पोलीस पाटलांच्या मानधन वाढीचा आणि इतर मागण्यांचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
यासाठी संघटनेच्या माध्यमातून शासनाविरोधात आवाज उठविणार असल्याचे पंढरीनाथ पाटील यांनी यावेळी जाहीर केले. तर यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना लोकाभिमुख, पारदर्शकता व कामात गती आणण्यासाठी पोलीस पाटील पदाचे महत्त्व वाढविण्याची आवश्यकता आहे.पोलीस पाटीलांनी गाव, ग्रामपंचायत व पोलीस यंत्रणेच्या संपर्कात रहा, लोकांचा विश्वास संपादन करा असे आवाहन संजय पाटील यांनी केले.
यावेळी अनेक पोलीस पाटलांनी त्यांना भेडसावत असणाऱ्या व्यथा मांडल्या.प्रवास भत्ता प्राप्त करण्यासाठी पोलीस पाटलांना शासन दरबारी अनेक खेपा घालाव्या लागतात.अधिकारी प्रवास भत्ता काढण्यासाठी सरळ पैशाची मागणी करतात. चिरीमिरी दिल्याशिवाय ते प्रवास भत्त्याचे पैसेच हातात देत नाहीत.हे थांबायला पाहिजे अशी खंतही अनेक पोलीस पाटलांनी जाहीर सभेतून व्यक्त केली. यावेळी उपस्थित अनेक पोलीस पाटलांनी विशेष लक्षवेधी सूचनाही मांडल्या.
या आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी रायगड जिल्हा अध्यक्ष महादूदादा पाटील, उत्तर विभागीय अध्यक्ष रामदास म्हात्रे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष राम सावंत, रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर गोळे, सहसचिव लक्ष्मण पाटील, नवी मुंबईचे अध्यक्ष संजय पाटील, तालुका सहसचिव उमेश गोंधळी, सुधागड तालुका सचिव महेश शिरसे, मुख्य संघटक सुरेश सोनावणे, खजिनदार नरेश तुपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत भोईर, सहखजिनदार संतोष मोकल, उरण संपर्क प्रमुख प्रमोद आगलावे, उरण तालुका अध्यक्ष रंगनाथ पाटील, उरण तालुका माजी अध्यक्ष शांताराम म्हात्रे, कर्जतच्या अध्यक्षा सुरेखा मराठे, रायगड जिल्हा कमिटीच्या मालती पायगुडे, रायगड जिल्हा सदस्या सुरेनी कोळी, उरण तालुका उपाध्यक्षा सुनीता ठाकूर, पोलीस पाटील सुरेखा फेगडे, पोलीस पाटील ज्योती घरत, पोलीस पाटील भक्ती चव्हाण, पोलीस पाटील शुभांगी पाटील, पोलीस पाटील सुजाता पाटील, पोलीस पाटील रेखा दिसले, पोलीस पाटील अनिता आदईकर, पोलीस पाटील जोत्सना म्हसकर, पोलीस पाटील दत्ताराम गोंधळी, पोलीस पाटील विनायक मोकल, पोलीस पाटील दीपक म्हात्रे तसेच रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील व राज्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.