थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:54 AM2020-12-26T00:54:59+5:302020-12-26T00:55:14+5:30
Khalapur : नाताळ आणि थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी महानगरातील गर्दी रायगडात होऊ शकते.
वावोशी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीच्या संचारबंदीचे आदेश लागू केल्याने सरत्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी महानगरातील गर्दी खालापूर तालुक्यातील विविध भागांत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खालापूरमध्ये पोलीस पाटलांची बैठक घेत फार्महाउसवर होणाऱ्या रेव्ह पार्ट्या तसेच गावात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठीची जबाबदारी देत थर्टी फर्स्टवर करडी नजर ठेवण्याचे आदेशच दिले आहेत.
नाताळ आणि थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी महानगरातील गर्दी रायगडात होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पोलिसांना सक्त आदेश दिल्यामुळे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी पोलीस पाटलांची बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती. या वेळी खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पाटील उपस्थित होते. डीवायएसपी संजय शुक्ला यांनी उपस्थित पोलीस पाटलांच्या अडचणी जाणून घेतल्या. खालापूर तालुक्यातील हॉटेल, फार्महाउस आणि खेडेगावांमध्ये होणाऱ्या रेव्ह पार्ट्या, सरत्या वर्षाचा आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रीचे डीजे वाजविणे अशा कार्यक्रमांवर बंदी असून, गर्दी टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर खालापुरातील पोलीस पाटलांनी सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी केले
आहे.