पोलीस कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:18 AM2021-03-03T00:18:27+5:302021-03-03T00:18:34+5:30
५ ते ६ वर्षे करावी लागणार प्रतीक्षा ; गृह प्रकल्पाच्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम सुरू
- राकेश खराडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोपाडा : सर्वांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. चोवीस तास ऑनड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दयनीय अवस्थेत असणाऱ्या इमारतीमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य करावे लागत आहे. मात्र, आता पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी किमान ५ ते ६ वर्ष लागणार आहेत. सद्यस्थितीत प्रत्यक्ष गृह प्रकल्पाच्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे.
पोलिसांना स्वस्त दरामध्ये घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी पोलिसांनी एकत्रित येऊन बृहन्मुंबई सहकारी गृहनिर्माण सोसायटी, शिवाजीनगर स्थापन केली. अतिरिक्त आयुक्त प्रताप दिघावकर यांच्या पुढाकाराने ही सोसायटी स्थापन झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बजेटमध्ये या सोसायटीमध्ये घरे उपलब्ध होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदासोबतच समाधानाचेही वातावरण आहे . ही सोसायटी एकूण १० हजार घरांची असून, ही देशातील सर्वात मोठी पोलीस सोसायटी ठरणार आहे. त्यामुळे या टाऊनशिप प्रोजेक्टचा फायदा मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे पोलिसांसाठी स्वस्त दरात घरे बांधली जाणार आहेत.
यासाठी सरकारकडून आकारला जाणारा सुमारे ३० कोटी रुपयांचा प्रीमियम माफ केला जाणार
आहे.
सर्वांचे रक्षण करण्यासाठी तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलीस कर्मचारी नेहमीच तत्पर असतात. आपल्या जिवावर उदार होऊन ते २४ तास ऑनड्युटी राहून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र, या पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना योग्य त्या सोयीसुविधा नसल्याने त्यांच्या राहणीमानासह त्यांच्या कामावरही परिणाम होत असतो.
अनेक ठिकाणी असणाऱ्या पोलीस वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेकदा तक्रारी, पत्रव्यवहार करूनही पोलीस
कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना योग्य त्या सोयीसुविधा पुरविण्यात
शासन काहीअंशी अयशस्वी ठरले आहे.
मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतींमधील इमारतीत पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे आता या नव्याने साकारणाऱ्या भव्य अशा पोलीस सोसायटीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.
वयाळ गावाजवळ पोलिसांसाठी साकारण्यात येणार भव्य सोसायटी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाजवळील वयाल गावाजवळ पोलिसांची पहिलीच एवढी मोठी भव्य सोसायटी साकारण्यात येणार आहे. या सोसायटीमध्ये असणारी घरेही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बजेटमध्ये असतील.
त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या सोसायटीमध्ये अवघ्या १५ लाखांमध्ये ७०० चौ. फुटाचे घर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. (६०० चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळ, ७७५ फूट बिल्टअप क्षेत्रफळ) १०६ एकर जमिनीवर गृहसंकुल उभारले जाणार आहे.
या टाऊनशिपला २ एफएसआय देण्यास तत्वत: मंजुरी मिळाली आहे. १० हजार घरांची पोलिसांची देशातील ही पहिलीच सोसायटी ठरणार आहे. घरासाठी आतापर्यंत ५२४३ सभासदांनी नोंदणी केली आहे त्याचप्रमाणे अजूनही नोंदणी सुरू असून, जास्तीत जास्त पोलीस कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवघ्या १५ लाखांत घर मिळणार असल्याने पोलिसांसाठी अच्छे दिन येणार असून, स्वप्नातील घर मिळण्यास आणखी किमान ५ ते ६ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असे चित्र गृहप्रकल्प ठिकाणी आहे.
सध्या गृहप्रकल्प ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. पूर्ण झाल्यावर भूमिपूजन व पुढील बांधकामाला सुरुवात होणार आहे. - प्रोजेक्ट मॅनेजर, कुमार भालचंदानी