अलिबाग : कोणताही कायदा वा नियम हा पोलिसांनी तयार केलेला नसतो. कायदे हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठीच केलेले असतात. पोलीस केवळ त्याची अंमलबजावणी करतात. पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद असेल, तर प्रश्न उद्भवू शकत नाहीत आणि विविध समस्या सुटू शकतात, असा विश्वास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी शनिवारी व्यक्त केले आहेत.
पोलीस रायझिंग डे आणि सप्ताहानिमित्त अलिबाग पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित पोलीस रायझिंग डे कार्यक्रमात पारसकर बोलत होते. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते व अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ल. नि. नातू विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
पारसकर म्हणाले, आधुनिक युगात, आपल्या मुलाबद्दल आईवडिलांना नाही, त्यापेक्षा अधिक माहिती ‘गुगल’ला असते. आपले ईमेल अॅड्रेसद्वारे गुगलला जोडलेले असतात. परिणामी, मोबाइलमुळे तुमचे लोकेशन, तुम्ही कोणत्या वेबसाइट्स पाहिल्यात, कोणाला फोन केला वा मेसेज केला याची संपूर्ण माहिती गुगलवर संग्रहित होते. परिणामी, आपल्या हातून चुकीची कृती मोबाइलवरून होत नाही ना, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.प्रदीप नाईक म्हणाले, पोलीस जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात याचे भान जनसामान्यांनी ठेवून पोलिसांसोबत सुसंवाद राखणे गरजचे आहे. हेल्मेटसक्ती पोलीस करतात यात जनतेचेच हित आहे. पोलिसांबाबत सकारात्मकता स्वीकारणे गरजेचे असल्याचे नाईक यांनी सांगितले. या वेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी महिला अत्याचार विषयक कायद्यांतील तरतुदींची माहिती दिली, तर अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ल. नि. नातू यांनी पोलीस यंत्रणेबाबतचे आपले अनुभव सांगितले.वैशिष्ट्यपूर्ण पथनाट्यच्५८ वर्षांपूर्वी २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज समारंभपूर्वक प्रदान केला होता. तेव्हापासून २ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाचा रायझिंग डे साजरा केला जातो. २ ते ७ जानेवारी या काळात रायझिंग डे सप्ताह आयोजित करून पोलीस व नागरिक नाते वृद्धिंगत केले जाते, अशी माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.श्वानांची प्रात्यक्षिकेच्रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख सुरेश वराडे व दशरथ पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रीझम सामाजिक संस्थेच्या कला पथकाने या वेळी पथनाट्य सादर केले तर रायगड पोलीस श्वान पथकाने या वेळी पोलीस तपासाचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविले.