विद्यार्थ्यांना शस्त्र, वाहतुकीच्या नियमांची पोलिसांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:01 AM2020-01-06T01:01:25+5:302020-01-06T01:01:32+5:30
पोलीस व जनता यांनी एकजुटीने गुन्ह्यांना आळा घालावा, या उद्देशाने रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माणगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून २ ते ८ जानेवारी २०२० दरम्यान ‘रायझिंग डे’चे आयोजन करण्यात आले आहे.
माणगाव : पोलीस व जनता यांनी एकजुटीने गुन्ह्यांना आळा घालावा, या उद्देशाने रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माणगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून २ ते ८ जानेवारी २०२० दरम्यान ‘रायझिंग डे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये कायद्याचे प्रबोधन करणे, गुन्ह्यासंबंधी माहिती देणे, पोलीस दैनंदिनी कामकाज नागरिकांसमोर मांडणे, शस्त्रप्रदर्शन भरवणे आदी प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यानुसार आपल्या जिल्ह्यात या कार्यक्रमामध्ये तपास प्रक्रिया व कोर्ट कामकाज यावर लक्ष देऊन गुन्ह्यातील दोषसिद्धेचे प्रमाण वाढविणे तसेच राज्यातील जनतेसाठी सुरक्षित व निर्भय वातावरण तयार करण्यावर भर राहील याकडे लक्ष देण्यात यावे व आगामी वर्षात महिला, नागरिक, लहान मुले, अल्पसंख्याक समाजातील अशा घटकांचा सुरक्षित वातावरण तयार होईल, असे प्रयत्न करून ‘पोलीस रायझिंग डे’ साजरा करण्यात येत आहे.
माणगाव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले व त्यांची टीम पोलीस हवालदार टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल म्हात्रे, महिला पोलीस नाईक ओमले, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी माणगावमधील शाळांना भेट देऊन विद्यार्थी व शिक्षक यांना शस्त्राबद्दल व वाहतुकीचे नियम याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच दामिनी पथक, बडी कॉप यांची कार्यशैली काय आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच माणगाव एसटी स्टॅण्ड येथे रायगड पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाद्वारे देशभक्तीपर संगीत सादर करून पोलीस दलाची प्रतिमा वाढविण्याचा एक उपक्रम राबविला.
।पथनाट्यातून जनजागृती
‘आॅन ड्युटी २४ तास’ या पथनाट्यातून प्रीझम संस्थेच्या कलाकारांनी पोलिसांच्या कार्याची माहिती दिली. माणगाव बसस्थानकात पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी के ली होती.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायम आपली जबाबदारी पार पाडत असलेले बीटमार्शल व महिलांची छेडछाडीस आळा बसावा याकरिता विविध शाळा-कॉलेज येथे कायम लक्ष ठेवणारे दामिनी पथक, महिला सुरक्षिततेसाठी प्रतिसाद अॅप, वाहतुकीसंदर्भातील कायदे, अपहरण, नशा, दहशतवाद असे गुन्हे केल्यास कोणती कारवाई केली जाते, याविषयी पथनाट्यातून उत्तमरीत्या जनजागृती केली.
या पथनाट्याचे नेतृत्व प्रीझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी यांनी के ले. तर पथनाट्यात सपना पटवा, स्वप्नाली थळे, प्रसाद अमृते, अभिजित नाईक, सूचित जावरे, तुषार राऊळ, मानसी पाटील, निशिता पाटील, वैष्णवी नागे आदी कलाकार सहभागी झाले आहेत.
>रेवदंडा येथे ‘रायझिंग डे’निमित्त रॅली
रेवदंडा : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामार्फ त ‘रायझिंग डे’चे आयोजन करण्यात आले होते.
येथील स. रा. तेंडुलकर विद्यालयाच्या प्रांगणात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीबरोबर या दिवसाचे महत्त्व विशद केले.
याप्रसंगी प्राचार्य रामदास पाडगे, शिक्षकवृंद, पोलीस कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालय ते पारनाकापर्यंत रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर पारनाका येथे पोलीस बॅण्ड पथकाने बॅण्ड मास्टर सहायक फौजदार अंकुश जाधव (अलिबाग) यांनी देशभक्तीपर गीते सादर के ली.
>रायझिंग डेनिमित्त चिरनेरमध्ये मार्गदर्शन
उरण : उरण पोलीस ठाण्याच्या वतीने महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक हायस्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींना पोलीस, शस्त्रास्त्र, गुन्हेगारी प्रवृत्ती, पोलिसांबाबतचे गैरसमज, बालकांवरील अत्याचार, चोरी, गुन्हेगारी, घरफोडीतील गुन्हे व स्वसंरक्षण आदीबाबत येथील इंग्रजी माध्यमातील मुख्याध्यापक रघुनाथ पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक मल्लिकार्जुन वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षणी पोलिसांची तत्काळ मदत हवी असल्यास १०० नंबरवर कॉल करा, असे सांगितले.