सुधागडात गावठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 02:32 AM2019-12-28T02:32:18+5:302019-12-28T02:32:35+5:30
पाली : गावठी दारूभट्टीवर सुधागड-पाली पोलिसांनी छापा टाकत सुमारे एक हजार ६०० लीटर दारू बनवण्याचे रसायन उद्ध्वस्त के ले. ...
पाली : गावठी दारूभट्टीवर सुधागड-पाली पोलिसांनी छापा टाकत सुमारे एक हजार ६०० लीटर दारू बनवण्याचे रसायन उद्ध्वस्त के ले. एकाला ताब्यात घेतले असून, ही कारवाई गोंदाव गावाच्या हद्दीतील जंगल भागात नदीच्या ओढ्याजवळ करण्यात आली. गोंदाव गावाच्या हद्दीतील जंगल भागातील ओढ्याजवळ गावठी दारू बनवण्याची भट्टी सुरू आहे, अशी माहिती पाली पोलिसांना मिळाली होती.
२५ डिसेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, चाळके यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांच्याकडील दारूबंदी पथकामधील पोलीस हवालदार, पोलीस नाईक आदीनी गोंदावगावच्या जंगल भागात सुमारे दोन किलोमीटर चालून गेल्यानंतर ओढ्याजवळ भेट दिली. त्या वेळी सहा प्लास्टिक पिंप व दोन लोखंडी पिंप जमिनीत पुरून ठेवल्याचे आढळून आले.
त्यामध्ये दारू बनवण्याचे कच्चे गूळमिश्रीत रसायन होते. त्या ठिकाणी आरोपी हा काठीने ढवळत असताना दिसून आला, त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कारवाईमध्ये एकूण सहा प्लास्टिक पिंप आणि दोन लोखंडी पिंप आणि एक हजार ६०० लीटर गावठी हातभट्टी चेकचे रसायन, असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचे साहित्य नष्ट केले.
आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाली पोलीस पुढील तपास करत आहेत.