अलिबाग : घरातील किमती ऐवज चोरीला गेल्यावर घरच्यांची काय अवस्था होते, याचा विचार न केलेलाच बरा. मात्र, अशा काही कुटुंबांना पोलिसांनी दिलासा दिला आहे. गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून लुटलेला ऐवजही हस्तगत करून तो मूळ मालकांना परत केला. रायझिंग डेनिमित्त पोलिसांनी तब्बल १३ गुन्ह्यांतील २४ लाख ६४ हजार २५७ रुपयांचे ८५०.४७ ग्रॅम वजनाच्या सोन्या-चांदीच्या वस्तू मालकांना परत केल्या.
रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या कार्यालयात मुद्देमालाच्या हस्तांतराचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्र मामध्ये नेरळ पोलीस ठाण्यातील-५, कर्जत पोलीस ठाण्यातील-३, कोलाड पोलीस ठाण्यातील-२ आणि पोयनाड, रोहा, गोरेगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १ अशा एकूण १३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या विविध ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी अत्यंत जिकिरीने केला. ज्यांनी दरोडे टाकून घरफोड्या केल्या होत्या. त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचून चोरलेला मुद्देमालही जप्त केला. एकूण २४ लाख ६४ हजार २५७ रुपये किमतीची ८५०.४८ ग्रॅम वजनाची सोन्या-चांदीची एकूण २८ आभूषणे परत मिळवली.
दरोड्यामध्ये आपल्या मेहनतीचा आणि हक्काचा ऐवज गेला, या धारणेमध्ये असलेल्या मालकांना सदरच्या वस्तू पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या हस्ते परत देण्यात आल्या. याप्रसंगी मालकांच्या चेहºयावर समाधानाची आणि आनंदाची लहेर पाहायला मिळाली. पोलिसांनी ठरवल्यास ते गुन्हेगारांचा छडा लावू शकतात. रायगडच्या पोलिसांनी केलेली कामगिरी खरेच कौतुकास्पद असल्याचे मालकांनी सांगितले. रायगड पोलिसांनी भविष्यातही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहावे आणि गुन्हे रोखण्याचा, गुन्हेगारांना शासन करण्याचा प्रयत्न करावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली.
रायझिंग डेनिमित्त जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जावेद शेख यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.