राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग :मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे याच्या उपोषणाला सर्व जिल्ह्यातून पाठिंबा मिळत असून आमदार, खासदार यांना अनेक ठिकाणी गाव, तालुका बंदी करण्यात येत आहे. मराठा समाजाकडून आंदोलन ही ठिकठिकाणी सुरू झाले आहे. काही प्रमाणात आंदोलनाला हिंस्त्र वळण येऊ लागले आहे. त्यामुळे आमदार, खासदार यांचे संरक्षण वाढवले आहे. अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांच्या चाळमळा येथील सुमन क्रियेशन निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत समाज बांधव पेटून उठला आहे. मनोज जरांगे हे नेतृत्व करीत असून समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. आमदार, मंत्री, खासदार यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी यांना अडवले जात आहे. रायगड जिल्ह्यातही मराठा समाजातर्फे उपोषण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार यांना जाब विचारला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या निवासस्थानी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांच्या चाळमळा सुमन क्रियेशन निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज हा आक्रमक झाला आहे.