रायगड : वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह नितेश सारडा आणि फिराेज शेख यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती. त्याला आव्हान देणारा अर्ज रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आज दाखल केला आहे. त्या अर्जावर शनिवारी सुनावणी हाेणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी दिली. अर्णब गाेस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी हाेणार आहे. त्यामुळे गाेस्वामी यांना न्यायालयीन काेठडीतच राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. काेविडमुळे अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेमध्ये उपकारागृह निर्माण केले आहे. त्या ठिकाणीच गाेस्वामी, शेख आणि सारडा यांना ठेवण्यात आले. याच ठिकाणी विविध गुन्ह्यांतील ४२ आराेपीही आहेत. शेख आणि सारडा यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर शनिवारी सुनावणी होईल.
हक्कभंग समितीकडेही अर्णब यांची पाठविधानसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर होण्याचे आदेश देऊनही अर्णब गोस्वामी यांनी त्याकडे पाठ फिरवली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, गोस्वामी यांना अनेक वेळा विधानभवनाने नोटीस पाठवली. मात्र त्यांनी आजपर्यंत एकाही नोटीसचे उत्तर दिलेले नाही.