वीरेश्वर महाराजांना पोलीस मानवंदना द्यावी
By admin | Published: February 9, 2016 02:23 AM2016-02-09T02:23:02+5:302016-02-09T02:23:02+5:30
वीरांचा वीर आणि पराक्रमाचा भोक्ता, समाजप्रबोधन आणि आपुलकीच नातं जपणाऱ्या महाडच्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव पुढील महिन्यात साजरा होणार आहे. गगनाला
महाड : वीरांचा वीर आणि पराक्रमाचा भोक्ता, समाजप्रबोधन आणि आपुलकीच नातं जपणाऱ्या महाडच्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव पुढील महिन्यात साजरा होणार आहे. गगनाला भिडणाऱ्या उंचच उंच सासण काठ्या खातू सनई, ढोलाच्या तालबद्ध ठेक्यात खांद्यावर नाचवण्याची परंपरा लाभलेल्या कोकणातील एकमेव छबिना उत्सवात वीरेश्वर महाराजांना पालखीप्रसंगी पोलिसांची सशस्त्र मानवंदा मिळावी. या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन या छबिना उत्सवाच्या भव्यतेला मानाचा तुरा लावावा, अशी मागणी महाडकरांकडून केली जात आहे.
छबिना उत्सवाची सुरुवात होते तीच मुळी तिथीप्रमाणे. म्हणजे पुरातन भारतीय संस्कृतीचा मान राखीत पहिल्या दिवसापासून या उत्सवात नारदीय कीर्तनाची परंपरा आहे. या नारदीय कीर्तनामध्ये समाज प्रबोधनाचेच डोस पाजले जातात. महाशिवरात्रीपासून सुरू होणाऱ्या या छबिना उत्सवात छोटेमोठे मान हे समाजातील सर्व जाती-जमातींना दिले जातात, हे प्रकर्षाने पाहायला मिळते. यात दिवे, कंदील व मशाली पेटवण्याचा व त्या मशाली धरण्याचा मान हा आजही आदिवासींनाच दिला जातो. अनेक गावांच्या ग्रामदेवता आपल्या लाडक्या वीरेश्वराला भेटण्यासाठी वाजतगाजत मिरवणुकीने येतात. छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर जाण्यापूर्वी महाडच्या या वीरेश्वराचे दर्शन घेत असत. हा छबिना उत्सव म्हणजे राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या जाती-धर्माचे लोक या उत्सवात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात. (वार्ताहर)