दासगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या महाड शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर सध्या पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील विनामास्क फिरत असलेल्या नागरिकांवर अद्याप कोणतीच कारवाई केलेली दिसून येत नाही. ग्रामीण भागातून पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी रविवारी महाड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दासगावमध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना चांगलाच दणका देण्यात आला.काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर कोरोना मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. शिथिलतेनंतर नागरिकांनी पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो याचा विचारच केला नाही. लग्नसभारंभ, इतर कार्यक्रम यावर काही प्रमाणात बंदी असतानादेखील लोक कोरोनाला विसरून सर्व कार्यक्रम करू लागले. मास्क घालणे सोडून दिले, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला गेला. त्याचे भोग पुन्हा दुसऱ्या लाटेच्या स्वरूपात हळूहळू भोगावे लागत आहेत. आजच्या परिस्थितीत पुन्हा कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात सुरू झाली असून, महाड तालुक्यात काही महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर होती ती हळूहळू वाढू लागली आहे. सध्याच्या परिस्थितीत दर दिवस गेल्या वर्षासारखेच कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या महिनाभरापासून महाड तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महाड शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशावेळी ग्रामीण भागातील व्यक्ती फक्त आणि फक्त शहरामध्ये आल्यानंतरच कारवाईच्या भीतीने मास्क लावत आहे. आपल्या गावी गेल्यानंतर कोणतीच कारवाई होत नाही त्यामुळे एकही व्यक्ती मास्कचा वापर करत नाही. याचा परिणाम पुढे भोगावा लागू नये यासाठी महाड शहारामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.१२ जणांकडून १,२०० रुपये दंड वसूल दासगावमध्ये महाड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सतीश दडस, महिला पोलीस काॅन्स्टेबल सोनल बर्डे, चार होमगार्ड आणि ग्रामपंचायतचे दोन कर्मचारी या पथकाने संपूर्ण दासगावमध्ये फिरत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलीस पथकाची कारवाई पाहून अनेक नागरिकांची पळापळ झाली. कारवाईमध्ये १२ नागरिकांकडून १२०० रुपये दंड वसूल करण्यात आले. दिवस भर कारवाईच्या भीतीने संपूर्ण दासगावमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली तर संध्याकाळपर्यंत प्रत्येक व्यक्ती महिला असो पुरुष मास्क लावूनच फिरताना दिसून आले. संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात अशी कारवाई होणे गरजेचे आहे.कोरोनाची भीती राहिलेली नाहीसध्या महाड तालुक्यात करोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. दर दिवसाला ५ ते १० असे रुग्ण सापडत आहेत. पुढे जाऊन ही संख्या मोठ्या प्रमाणात होणार आहे. ग्रामीण भागात लग्नकार्यांना मोठा जोर आहे. नागरिकांना कोरोनाची कोणतीच भीती राहिलेली नाही. लग्नकार्यात सोशल डिस्टन्सिंग नाही, मास्क नाही. ग्रामीण भागात फिरताना नागरिक आजही मास्क वापरत नाही. बेफिकिरीने वागणाऱ्या नागरिकांचा फटका पुढे मोठ्या प्रमाणात बसणार आहे.आजच या गोष्टीला आला बसणे गरजेचे आहे. ज्या पध्दतीने पोलिसांनी दासगावमध्ये फिरत कारवाईची दहशत निर्माण केली आणि शिस्त लावली तशी संपूर्ण तालुक्यातील गावांगावामध्ये कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनावर नियंत्रण आणता येईल.
विनामास्क फिरणाऱ्यांची पोलिसांनी घेतली खबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 1:34 AM