पोलीस-ग्रामस्थांनी केली भरकटलेल्या ट्रेकर्सची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:08 AM2018-05-16T03:08:17+5:302018-05-16T03:08:17+5:30
नेरळ गावाच्या मागे आणि माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या विकटगड अर्थात पेब किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात.
कर्जत : नेरळ गावाच्या मागे आणि माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या विकटगड अर्थात पेब किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. रविवारी ट्रेकिंगसाठी पेब किल्ल्यावर आलेले तरुण वाटेतच भरकटले. अखेर नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तिन्ही तरुणांना शोधून सुखरूप नेरळ येथे आणले.
मूळचे गुजरातमधील असलेले देवर्षी विरमाराज, केतन कीर्ती भानुशाली, लक्ष्मीकांत सुरण साकी हे तीन तरुण नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये राहत आहेत. त्यांनी ट्रेकिंगसाठी पेब किल्ल्यावर जाण्याचे नियोजन केले. त्यासाठी इंटरनेटवरून माहिती घेतली. शनिवारी रात्री मुंबई येथून निघून नेरळ रेल्वेस्थानकात पोहोचले. स्थानकात विश्रांती घेऊन ते तिघे पेब किल्ल्यावर जाण्यास निघाले. पहाटे ५ वाजता नेरळ गावातून मोहाची वाडी आणि तेथून आनंदवाडी असे पेब किल्ला चढू लागले. सकाळी ६ पूर्वी पेब किल्ला चढू लागल्याने आनंदवाडीमधील कोणीही आदिवासी लोकांनी त्यांना पेब किल्ल्याकडे जाताना पाहिले नाही.
पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाणारे ट्रेकर्स हे आनंदवाडी येथून रस्ता दाखवण्यासाठी गाइड घेऊन जात असतात. किल्ल्यावर डोंगर चढून जाताना अर्धे अंतर पार केल्यानंतर त्यांना रस्ताच सापडत नव्हता. शेवटी त्यातील एका तरुणाने ९.३० वाजता १०० क्रमांकावर फोन करून, भटकटल्याची माहिती पोलिसांना दिली. नेरळ पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार अवंती पाटील यांनी त्याबाबत माहिती प्रभारी अधिकारी सोमनाथ जाधव यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांची शोधमोहीम सुरू झाली. सायंकाळी ४.३०च्या सुमारास या तिघांचा शोध घेण्यात यश आले.