श्रीवर्धन - मानवी आयुष्यातील वार्धक्याच्या टप्प्यावर आयुष्याचा लेखाजोखा मांडत असताना प्रेम, आपुलकी, स्नेह, आत्मीयता, आदर व ईश्वर भक्ती याची आस लागलेली असताना भावनांचा होणारा कोंडमारा सहन करत जीवन जगताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यात असंख्य अडचणी येतात. अशा कठीण प्रसंगी पोलीस दलाकडून होणारी आपुलकीची विचारणा ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितच सुखद आहे.समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या पोलीस यंत्रणेने ज्येष्ठ नागरिकांच्या गृहभेटीला श्रीवर्धनमध्ये प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या विविध भागांतील ज्येष्ठ नागरिकांच्या गृहभेटीस सुरुवात केली आहे. श्रीवर्धन दामिनी पथक व स्थानिक पोलीस नियमित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचे निराकारण करत आहेत.
मंगळवारी सायंकाळी पोलीस कर्मचारी कविता देवर्डेकर व परशुराम टेकाळे यांनी गणेश आळीमधील रोहिणी क्षीरसागर यांची गृहभेट घेतली. या प्रसंगी पोलीस कर्मचाऱ्यांनी रोहिणी यांच्याशी अतिशय सोज्वळ व आपुलकीने संवाद साधला. रोहिणी यांची मुलगी पुण्यात असते. सद्य:स्थितीत त्या घरात एकट्याच असतात. अशा एकांताच्या काळात पोलीस दलाने कल्पकतेने सुरू केलेल्या या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखद बाब ठरत आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला संरक्षण देण्याचे दायित्व पोलीस प्रशासनाचे आहे; परंतु त्यासोबत मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजहिताला प्राधान्य देते. श्रीवर्धनमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी काही वेगळं करता येईल का या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.- प्रमोद बाबर, पोलीस निरीक्षक श्रीवर्धन
श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे कविता देवर्डेकर व परशुराम टेकाळे यांनी माझ्याशी अतिशय आदराने व प्रेमाने संवाद साधला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. या उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांना निश्चितच फायदा होईल. त्यांच्या अनेक समस्यांचे या उपक्रमात निर्मूलन होईल याची खात्री वाटते.-रोहिणी क्षीरसागर, ज्येष्ठ नागरिक श्रीवर्धन पोलीस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही श्रीवर्धन शहरातील विविध भागात जाऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत आहोत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली जात आहे.-कविता देवर्डेकर, दामिनी पथक श्रीवर्धन