अलिबाग : सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील सागरी हद्दीत पोलिस, तटरक्षक, नौदल यांच्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ऑपरेशन ‘सागर कवच’ला गुरुवारी सुरुवात झाली. ३६ तासांमध्ये सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तात्पुरत्या पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७८ पोलिस अधिकारी, ५१८ पोलिस कर्मचारी, तर २०० सागरी सुरक्षा दलाचे सदस्य या बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.
सागर कवच मोहीम कशासाठी?२६/११ नंतर पोलिस आणि राज्य सरकार सागरी सुरक्षेच्या बाबतीत अधिक जागरूक झाले. रायगड जिल्ह्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला लक्षात घेऊन पोलिसांनी अशा व्यापक सागरी हद्दीचे रक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. सागरी हद्दीत अनोळखी बोट दिसली तरी किनाऱ्यावर राहणाऱ्यांमध्ये घबराट पसरते. अशा परिस्थितीत मच्छिमारांनीही सागरी सुरक्षेसाठी सज्ज असावे, ही गरज लक्षात घेऊन सागर कवच अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
संशयित व्यक्ती, वाहनांची चौकशी- जिल्ह्यात रायगड पोलिसांनी आता पुन्हा दोन दिवसांचे ‘सागर कवच’ विशेष ऑपरेशन सुरू केले आहे. सागरी हद्दीत पोलिसांकडून गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस ऑपरेशन केले जात आहे. यंत्रणा किती सक्षम आहेत याची तपासणी होत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यासह आसपासच्या सागरी हद्दीसह तसेच जवळच्या चेक पोस्टमधून संशयित व्यक्ती व वाहनांची चौकशी होत आहे. जाणाऱ्या-येणाऱ्या बोटींवर पोलिसांचे जसे लक्ष आहे, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ही मोहीम संपणार आहे.
मोहिमेत कोण कोण?
दोन दिवसांच्या या मोहिमेसाठी ५७७ कर्मचारीही स्थानिक पोलिसांना मदतीला दिले होते. त्याव्यतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा अपर पोलिस अधीक्षक, ७ डीवायएसपी, १५ पोलिस निरीक्षक, ५१ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक ५१८ ही मोहीम राबवीत आहेत.
आगामी काळात रायगड जिल्ह्यात होणाऱ्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा १२२ किमी सागरी किनारा सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून अतिरेकी कारवाई, दहशतवादी हल्ले रोखण्याकरिता सर्व सागरी विभागांची सतर्कता पडताळून पाहण्याकरिता गुरुवारी (१६ नोव्हेंबर) ते शुक्रवार (१७ नोव्हेंबर)दरम्यान सागरी कवच अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सुक्ष्म हालचालींवर नजर आहे - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक