पेशवे स्मारक संवर्धनासाठी पालिकेचे सकारात्मक धोरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:39 AM2018-08-23T01:39:36+5:302018-08-23T01:39:58+5:30
‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ; स्वच्छतेस नगरपालिकेचा प्रारंभ
श्रीवर्धन : आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या जन्मगावी श्रीवर्धनमधील पेशवेआळीत स्थापित स्मारकाची अवहेलना होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते.
या बातमीने श्रीवर्धन तालुक्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय स्तरांमध्ये चांगलीच चर्चा झाली. नगरपालिका प्रशासनाने सदर वृत्ताची तत्काळ दखल घेऊन पेशवे स्मारक परिसर स्वच्छतेस सुरुवात केली आहे. स्मारकाच्या प्रांगणात वाढलेले गवत काढण्यास सकाळीच सुरुवात केल्याचे निदर्शनास आले आहे. स्मारक नूतनीकरणासाठी विद्यमान राज्य सरकारने तत्त्वत: १८ कोटी चा निधी मंजूर केला आहे; परंतु राजकीय श्रेयवादाच्या लढाईत पेशवे स्मारक दुर्लक्षित झाल्याची चर्चा जनतेत चालू आहे. लक्ष्मी नारायण न्यास व नगरपालिका यांच्या सकारात्मक चर्चेतून स्मारकाचे भवितव्य अवलंबून आहे. कायदेशीर बाबींची परिपूर्ती करूनच नूतनीकरण होईल. नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेस प्रारंभ केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. सुनील तटकरेंच्या माध्यमातून आम्ही श्रीवर्धनचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. विकास हीच आमची ओळख आहे. जनतेसाठी समर्पित भावनेने कोण काम करत हे जनता ओळखून आहे. पेशवे स्मारकाची स्वच्छता सदैव ठेवली जाईल.
- नरेंद्र भुसाणे, नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपालिका
पेशवे स्मारक हे आपला ऐतिहासिक ठेवा आहे, त्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. ‘लोकमत’च्या वृत्त प्रसिद्धीनंतर नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेस सुरुवात केली, ही आनंदाची बाब आहे.
- शिवराज चाफेकर,
रहिवासी, श्रीवर्धन
पेशवे स्मारक हे श्रद्धास्थान आहे. त्याच्या नूतनीकरणमध्ये श्रेयवादाचा निर्माण झालेला प्रश्न दु:खद आहे. नगरपालिकेने योग्य खबरदारी घेतल्यास स्मारक परिसर सदैव स्वच्छ राहील. वेळप्रसंगी तालुक्यातील सेवाभावी संस्था स्मारक स्वच्छतेस मदत करतील.
- काशिनाथ गुरव, जीवनेश्वर,
पाखाडी श्रीवर्धन