पेण : कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील ३१ हजार ६७१ शिक्षकांच्या हक्काचा प्रतिनिधी राज्याच्या विधानपरिषदेत निवडून देण्यासाठी, ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराचा राजकीय माहोल या जिल्ह्यामध्ये रंगला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शेकाप गठीत पुरोगामी आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील व भाजपप्रणित शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू यांच्या मुख्य लढत होणार असून एकूण १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील ८ उमेदवार व रायगड जिल्ह्याचे २ उमेदवार अशी एकंदर स्थिती असून ३५ वर्षे या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. मात्र विद्यमान आमदार रामनाथ मोते यांनीच शिक्षक परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने दंड थोपटल्याने काँगे्रस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील या निवडणुकीत जायंट किलर ठरणार असे राजकीय समीक्षकांचे मत आहे.कोकणच्या विस्तीर्ण ७२० किमी अंतरावर ठाणे जिल्ह्यात १५ हजार ७६३, पालघर ५११५, रायगड १० हजार ९, रत्नागिरी ४ हजार ३२८ तर सिंधुदुर्ग २ हजार ४७६ अशी एकूण ३७ हजार ६७१ मतदार संख्या आहे. संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यात २० हजार ८७८ मतदार तर उर्वरित रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ हजार २६१ मतदार यामध्ये ३ हजार ६२९ मतदार ठाणे, पालघरमध्ये जास्त असल्यामुळे या मतदारसंघात भाजपप्रणित शिक्षक परिषदेचा ३५ वर्षे दबदबा कायम होता आणि आहे. आता मात्र विद्यमान आ.रामनाथ मोते यांनी बंडखोरी केल्याने या परिषदेच्या उमेदवार वेणूनाथ कडू यांना याचा फटका बसून त्याचा फायदा पुरोगामी लोकशाही आघाडीला मिळणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. रायगडात शेकाप राष्ट्रवादी भक्कम ताकद आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीत सुद्धा राष्ट्रवादी-काँग्रेसची ताकद मिळाल्याने बाळाराम पाटील यांची बाजू वरचढ ठरत आहे. शिक्षक भारतीचे उमेदवार अशोक बेलसरे, आ. रामनाथ मोते यांना मिळणारी मते ही भाजपच्या पारड्यातील कमी होणार असून त्यांचाही फायदा प्रत्यक्ष बाळाराम पाटील यांना मिळणार आहे. शिक्षक सेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याही स्कोर सन्मानजनक राहणार आहे. विशेष बाब म्हणजे ठाणे पालघरमधील ८ उमेदवार एकमेकांची मते खेचून विजयाची दरी कमी करण्यास ठाणे जिल्ह्यातलेच मतदार कारणीभूत ठरतील. याउलट ठाणे पालघरसह उर्वरित कोकणच्या तीन जिल्ह्यात पुरोगामी आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी व शेकापच्या आघाडीमध्ये अनेक शिक्षण संस्थाचा सहभाग व येथील १७ हजार २४९ मतदानात सर्वाधिक मतदान बाळाराम पाटील यांच्या खात्यात जमा होईल व ठाणे पालघरमधून मिळणारे मताधिक्य पाहता कोकण शिक्षक मतदार संघावर पुरोगामी आघाडीचा झेंडा फडकेल, असा राजकीय विश्लेषकांचा कौल आहेत. (वार्ताहर)
जिल्ह्यामध्ये रंगला राजकीय माहोल
By admin | Published: January 25, 2017 4:59 AM